अनुवादाच्या दस्तावेजासाठी साहित्य संस्थांचा पुढाकार

By admin | Published: April 26, 2016 01:22 AM2016-04-26T01:22:38+5:302016-04-26T01:22:38+5:30

नुवादित साहित्याची एकत्रित सूची तयार करून साहित्याच्या आदान-प्रदानाला योग्य दिशा देण्याच्या दृष्टीने राज्य मराठी विकास संस्था तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुढाकार घेण्याचे ठरविले आहे.

Initiative of Literary Institutions for translation documents | अनुवादाच्या दस्तावेजासाठी साहित्य संस्थांचा पुढाकार

अनुवादाच्या दस्तावेजासाठी साहित्य संस्थांचा पुढाकार

Next

प्रज्ञा केळकर-सिंग,

पुणे - मराठी तसेच इतर भारतीय भाषांमधील मोजक्या अनुवादित साहित्याची सूची प्रकाशकांकडे उपलब्ध असते. मात्र, सर्वच अनुवादित साहित्याची एकत्रित सूची तयार करून साहित्याच्या आदान-प्रदानाला योग्य दिशा देण्याच्या दृष्टीने राज्य मराठी विकास संस्था तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुढाकार घेण्याचे ठरविले आहे.
भाषाभगिनींचा मिलाफ व्हावा, इतर भारतीय भाषांमधील साहित्याचे ज्ञान अवगत करता यावे, यादृष्टीने अनुवाद हे अत्यंत प्रभावी माध्यम मानले जाते. भारतीय भाषा तसेच इंग्रजी भाषेतील अनेक पुस्तकांचा मराठीत अनुवाद करण्यात आला आहे. त्यातुलनेत मराठीतील साहित्याच्या इतर भाषांमधील अनुवादाचे प्रमाण काहीसे कमी आहे.
या सर्व अनुवादित पुस्तकांची एकत्रित सूची उपलब्ध झाल्यास विद्यार्थी, तसेच जाणकारांना माहितीचा खजिना खुला होऊ शकतो. यादृष्टीने आवश्यक असणारा प्रस्ताव राज्य मराठी विकास संस्थेच्या विचाराधीन आहे. याबाबतची चर्चा संस्थेच्या बैठकीत होत आहे.
संस्थेचे संचालक आनंद काटीकर म्हणाले, ‘‘अनुवादित साहित्याची एकत्रित सूची तयार करण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांनी संस्थेशी संपर्क साधल्यास काम वेगाने होऊ शकते. अन्यथा, अनुवादातील ३ तज्ज्ञांची समिती नेमून या कामाबाबतचा प्रस्ताव मंजूर केला जाईल. २७ एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीत अनुवादाचे रीतसर प्रशिक्षण, त्यादृष्टीने आवश्यक अभ्यासक्रम यांबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर इत्यादी ठिकाणी प्रायोगिक स्तरावर अनुवादाचा अभ्यासक्रम सुरु केला जाईल.’’
अनुवादाची एकत्रित सूची सध्या अस्तित्वात नसली, तरी राज्य मराठी विकास संस्थेचा ‘मराठी ग्रंथसूची’ हा प्रकल्प सुरू आहे. त्यामध्ये सन २०००पर्यंतच्या पुस्तकांची यादी करण्याचे काम अंतिम टप्प्यात
आहे.
मात्र, पुढील १५ वर्षांच्या पुस्तकांची दखल घेण्याच्या दृष्टीने सूचीचे काम हाती घेण्याचा मानस असल्याचेही, त्यांनी सांगितले.
एकत्रित सूचीबाबत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोशाध्यक्षा सुनीताराजे पवार म्हणाल्या, ‘‘मसापच्या नवीन कार्यकारिणीचे काम नुकतेच सुरू झाले आहे. त्यामुळे मराठी भाषेचा विकास आणि वारसा समृद्ध करण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविण्याचे ठरले आहे. सुनील सावंत या साताऱ्यातील प्राध्यापकांना नुकतेच साहित्य कला विकास प्रतिष्ठानतर्फे गौरवण्यात आले. त्यांनी सुमारे २०० अनुवादित पुस्तकांचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्याशी चर्चा करुन एकत्रित सूचीबाबतचा निर्णय घेतला जाईल. कार्यकारिणीच्या बैठकीतही हा मुद्दा चर्चिला जाऊ शकतो.’’
अनुवादित साहित्याचा एकत्रित लेखाजोखा उपलब्ध झाल्यास अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना लाभ होऊ शकतो. तसेच, मराठी भाषेच्या अभ्यासाकडील विद्यार्थ्यांचा ओढा वाढू शकतो, असे मत साहित्य वर्तुळात व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Initiative of Literary Institutions for translation documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.