...आणि त्यांनी उचलला झाडांना वेदनामुक्त करण्याचा विडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 04:12 PM2018-03-12T16:12:43+5:302018-03-12T16:12:43+5:30
झाडांना वेदाना मुक्त करण्यासाठी नेल फ्री,अाणि पेन फ्री हे कॅम्पेन पुण्यातील माधव पाटील व त्यांचे सहकारी राबवत अाहेत. यात शहरातील झाडांना ठाेकण्यात अालेले खिळे काढण्याचे काम दर अाठवड्याच्या रविवारी करण्यात येते.
पुणे : बाहेरगावी असल्याने अंगणातील तुळशीला पाणी देता न आल्याने तुळस सुकून गेली. आपण पाणी देऊ न शकल्याने तुळस मेल्याचे मुलीने वडीलांना सांगितले. मुलीच्या तुळस मेली या शब्दप्रयोगाने त्यांच्या मनात घर केले. आणि येथून पुढे प्रत्येक झाडाला वेदनामुक्त करण्याचा विडाच त्यांनी उचलला.
ही कहाणी आहे, पुण्यात अंघोळीची गोळी या शिर्षकाखाली पर्यावरण रक्षणाबाबत जागृती करणाऱ्या माधव पाटील यांची. माधव पाटील आणि त्यांच्या मित्रांनी नेल फ्री अॅण्ड पेन फ्री ट्री असे कॅम्पेन सुरु केले असून या अंतर्गत पुणे शहरातील विविध झाडांना जाहीरात लावण्यासाठी ठोकण्यात आलेले खिळे काढण्याचे काम करण्यात येत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून आत्तापर्यंत शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयापासून ते बालगंधर्व पर्यंत असलेल्या झाडांना ठोकण्यात आलेले खिळे काढण्यात आले आहेत.
माधव पाटील हे पेशाने इलेक्ट्रिक कल्संटंट आहेत. मात्र त्यांना लहानपणापासूनच पर्यावरणाबद्दल आस्था आहे. त्यांनी आंघोळीची गोळी या शिर्षकाखाली या आधीही अनेक उपक्रम राबविले आहे. पाटील हे झाडांच्या संवदेना यांवर अभ्यास करत असताना झाडांनाही भावना असतात याचे विस्तृत विवेचना करणारा लेख त्यांच्या वाचणात आला. तेव्हापासून त्यांच्या डोक्यात वेदनामुक्त झाड ही संकल्पना घोळत होती. यंदाच्या होळी पासून त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. दर रविवारी पाटील व त्यांचे सहकारी भेटून शहरातील विविध भागातील झाडांना ठोकण्यात आलेले खिळे काढण्याचे काम करताता. दर आठवड्याला कमीत कमी दहा झाडांना ठोकण्यात आलेले खिळे काढायचेच असा दृढ निष्चय त्यांच्या टीमने केला आहे.
या बाबात बोलताना पाटील म्हणाले, झाडांनाही वेदना असतात याबद्दलचा लेख माझ्या वाचणात आला होता. त्यातच आमच्या अंगणातील तुळस पाण्याअभावी जळून गेल्याचे माझ्या मुलीने माझ्या निदर्शनास आणले. तेव्हापासून झाडांना नेल फ्री व पेन फ्री करण्याचा विचार डोक्यात घोळत होता. यंदाच्या होळी पासून आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली आहे. हा उपक्रम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवून त्यांना या अभियानात सामिल करुन घेण्याचा आमचा विचार आहे.