पुणे जिल्ह्यातील ७ नद्या स्वच्छ करण्यासाठी पुढाकार; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 10:01 AM2022-10-14T10:01:28+5:302022-10-14T10:02:06+5:30
प्रदूषण रोखण्यासाठी उपाय....
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत आता राज्यातील ७५ नद्यांना स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सरकारनेही सहकार्य केले आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील ७ नद्यांचा समावेश आहे. या नद्यांना स्वच्छ करण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. स्थानिक पातळीवर नागरिकांना सहभागी करून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
अनेक वर्षांपासून राज्यातील, देशातील नद्या प्रदूषित झाल्या आहेत. त्यांना पुन्हा पूर्वीचे वैभव देण्यासाठी स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या आहेत. राज्य सरकारनेही चला जाणूया नदीला हे अभियान सुरू केले. त्यासाठी एक समिती बनवली आहे. त्यात पुण्यातील सुमंत पांडे, डाॅ. गुरूदास नूलकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक तसेच इतर सदस्यांमध्ये डाॅ. राजेंद्र सिंग, नरेंद्र चौघ, अनिकेत लोहिया यांचा समावेश आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पंचमहाभुतांचा समावेश आहे. त्यापैकी एक जल हे तत्त्व महत्त्वाचे आहे. पाण्याशिवाय जीवनच नाही. सजीवांच्या अस्तित्वासाठी पुरेशा स्वच्छ पाण्याची उपलब्धता आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांपासून अवर्षणाची स्थिती असल्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी नद्या पुनरुजीवित करणे आवश्यक आहे. जलप्रदूषण रोखावे लागेल. म्हणून हा चला नदी जाणूया उपक्रम सुरू करण्यात येत आहे. प्रशासकीय पातळीवर आणि स्वयंसेवी संस्थांकडून यासाठी काम होणार आहे.
या सात नद्यांवर काम
पुणे जिल्ह्यातील मुठा, भीमा, पवना, राम, घोड, मीना, इंद्रायणीचा समावेश आहे. या नद्यांवर एक-एक गट काम करेल. त्यासाठी नियोजन सुरू झाले आहे. नदीची यात्रा कशी काढायची, काय-काय उपक्रम घ्यायचे, लोकांना कसे जोडून घ्यायचे या विषयावर चर्चा करून एक आराखडा तयार होईल. त्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी उपाय
नदी प्रदूषित का होते, त्याची कारणे शोधली जातील. कोण-कोणत्या ठिकाणी सांडपाणी नदीत जाते. नदीचा उगम पाहून तिथून संगमापर्यंत काम केले जाणार आहे. ज्यामुळे प्रदूषण होते, ते रोखून लगेच उपाययोजना सुरू केल्या जातील.