परीक्षा संचालकांना हटविण्याच्या हालचाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:27 AM2019-03-01T01:27:57+5:302019-03-01T01:27:59+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : आज व्यवस्थापन परिषदेची बैठक
पुणे : विधी विषयाच्या पेपरफुटीला केवळ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण हेच जबाबदार आहेत, असा ठपका ठेवून त्यांना पदावरून हटविण्याच्या हालचाली विद्यापीठाच्या वरिष्ठ पातळीवरून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी विभागाच्या प्रथम वर्षाचे काही पेपर परीक्षेपूर्वीच संकेतस्थळावर अपलोड झाले होते. याप्रकरणी परीक्षा विभागाच्या संचालकांना दोषी धरण्यात येत आहे. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या समितीकडून संचालकांवर कारवाई करण्याची शिफारस केली.
परीक्षा मंडळाची बैठक बुधवारी पार पडली. त्यामध्ये परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांच्या कामकाजाबाबत सर्वांकडूनच नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून अधिकृतरीत्या पत्रकारांना कळविण्यात आले. वस्तुत: विद्यापीठामध्ये अनेक समित्यांच्या बैठका होतात, मात्र त्या बैठकांमध्ये झालेल्या निर्णयांची माहिती अधिकृतपणे देण्याचे टाळले जाते. त्याचा वृत्तांत अत्यंत मोघमपणे दिला जातो.
मात्र, परीक्षा संचालक दोषी असल्याचे अधिकृतपणे पत्रकारांना अनेकदा कळविण्यात येत आहे. या मागे विद्यापीठाच्या वरिष्ठ पातळीवर काही राजकारण शिरत असल्याची शंका विद्यापीठ वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्यासाठी काही विद्यार्थी संघटनांनी याविरोधात आंदोलन करावे यासाठी त्यांना फूस लावण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
वस्तुत: विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका अपलोड होण्याची ही घटना ही चुकीने घडली आहे. तरीही कारवाई करण्याचा हेका धरला जात आहे. विद्यापीठातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पैसे घेऊन प्रश्नपत्रिका फोडल्याचे उजेडात आले. त्यांच्यावर फौजदारी गुन्हेही दाखल झाले. मात्र त्यांना पुन्हा विद्यापीठाने नोकरीत घेतले. इथे केवळ चुकीने झालेल्या प्रकाराबद्दल थेट कारवाईचा बडगा उचलण्याच्या हालचाली सुरू आहेत.
व्यवस्थापन परिषदेच्या भूमिकेकडे लक्ष
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये ठराव मांडून परीक्षा विभागाच्या संचालकांवर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे गुरुवारी होत असलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्या काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
पेपर कधी घेणार, याबाबत मौन
विधी विभागाच्या परीक्षेपूर्वी संकेतस्थळावर प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या विषयांची पुन्हा परीक्षा घेणार, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र, किती विषयांची पुनर्परीक्षा होणार, ती कधी होणार, याबाबत विद्यापीठाकडून काहीच सांगितले जात नाही. त्यामुळे विधी विभागाच्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे.