भोरड्या पक्ष्याच्या संवर्धनासाठी पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:09 AM2021-03-06T04:09:37+5:302021-03-06T04:09:37+5:30
पुणे : भोरड्या पक्ष्याच्या संवर्धनासाठी, त्याच्या अधिवासाच्या संरक्षणाकरिता शासकीय पातळीवर निश्चित प्रयत्न केले जाणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार ...
पुणे : भोरड्या पक्ष्याच्या संवर्धनासाठी, त्याच्या अधिवासाच्या संरक्षणाकरिता शासकीय पातळीवर निश्चित प्रयत्न केले जाणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शविला. भोरड्याव्यतिरिक्त अन्य पशू-पक्ष्यांबाबतदेखील संवर्धनात्मक भूमिका घेणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘व्हाईस ऑफ द वाईल्ड’ या संस्थेचे औपचारिक उद्घाटन, संस्थेच्या लोगोचे आणि भोरड्या पक्ष्याबाबत माहितीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण झाले. जागतिक वन्यजीव दिनानिमित्त हा उपक्रम पार पडला. ज्ञानवृक्ष-देववृक्ष 'अजानवृक्षाला' जलार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. याप्रसंगी बायोस्फिअर्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन अनिल पुणेकर, प्रख्यात वन्यजीव छायाचित्रकार सुधीर सावंत, वन्यजीव चित्रपट निर्देशक निवेदिता जोशी, वन्यजीव प्रेमी मंदार नागरगोजे, वनप्रेमी शाहू सावंत आणि निसर्गप्रेमी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
‘व्हॉइस ऑफ द वाईल्ड’ या संस्थेच्या माध्यमातून ‘मेस्मेरायझिंग मर्मरेशन’ या स्थलांतरित भोरड्या किंवा पळस मैना' (Rosy Starling) या पक्ष्याच्या लघु-चित्रफितीचे अनावरणदेखील याप्रसंगी झाले. लघुपट हा डॉ. सचिन पुणेकर, सुधीर सावंत, निवेदिता जोशी यांनी निर्मित केला आहे. उपक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्तावना डॉ. सचिन पुणेकर यांनी केली, सुधीर सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
——————
पिकांवर येणारे किटक याचे भक्ष्य
भोरडा हा पक्षी परदेशी असून, हिवाळ्यात युरोपातून आपल्याकडे येत असतो. सासवड, जेजुरी, बारामती, उजनी परिसरात तो दिसतो. भोरड्यांची एक जोडी अनेकदा घरट्यांकडे अन्न घेऊन जात असते. त्यामध्ये अळी, टोळ, नाकतोडे असे अनेक कीटकांचा समावेश असतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा पक्षी मित्रच ठरतो. त्यामुळे या पक्ष्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे.
—————————