मराठी भाषा संवर्धनासाठी पुढाकार
By admin | Published: July 25, 2016 02:23 AM2016-07-25T02:23:29+5:302016-07-25T02:24:42+5:30
राज्यात विविध ठिकाणी झालेले मराठी भाषिक उपक्रम लेखी स्वरूपात संकलित करण्याचे काम राज्य मराठी विकास संस्थेने हाती घेतले असून, भाषेच्या विकासासाठी विविध
पुणे : राज्यात विविध ठिकाणी झालेले मराठी भाषिक उपक्रम लेखी स्वरूपात संकलित करण्याचे काम राज्य मराठी विकास संस्थेने हाती घेतले असून, भाषेच्या विकासासाठी विविध उपाय सुचविण्याचे आवाहन भाषाप्रेमी मंडळींना केले आहे.
सध्या इंग्रजी भाषेच्या बोलबालात मराठीचे अस्तित्व लोप पावत चालले आहे. तिला जिवंत ठेवायचे असेल, तर भाषेसंदर्भात काही पावले उचलली गेली पाहिजेत; मात्र शासन कसे आणि कुठे कमी पडते, याचाच पाढा अनेकदा भाषाप्रेमी मंडळींकडून वाचला जातो. भाषेच्या विकासासाठी ठोस उपाययोजना करणे ही शासनाचीच जबाबदारी आहे, असे गृहीत धरून त्याची पूर्तता करण्याची अपेक्षा केली जाते. त्यात पुन्हा दिरंगाई झाल्यास शासनालाच धारेवर धरले जाते. हे टाळण्यासाठी आता शासनानेच मराठी भाषा संवर्धनासाठी भाषाप्रेमींना ‘साद’ घातली आहे.
भाषेच्या उत्कर्षासाठी मराठी शाळांमधील शिक्षक, साहित्यसंस्था, भाषाप्रेमी मंडळी सातत्याने कार्यरत असतात. मराठीला समृद्ध करण्याकरिता त्यांच्याकडे विविध कल्पना असतात. एखादा विशिष्ट उपक्रम सुरू करावा, अशी त्यांची इच्छा असते. त्यांच्या कल्पना आणि उपक्रमांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने संस्थेने ही अभिनव संकल्पना आणली आहे. सर्व कल्पनांचे एकत्रिकीकरण करणे आणि त्याला मूर्त स्वरूप देणे हा त्यामागील विचार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांना सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक आनंद काटीकर यांनी ‘लोकमत’ला दिली. आपल्या उपक्रमाचा आराखडा आणि आपले अनुभव संस्थेच्या rmvs_mumbai@yahoo.com या ई-मेलवर किंवा एल्फिंस्टन तांत्रिक विद्यालय, ३ महापालिका मार्ग, धोबीतलाव मुंबई ४००००१ या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.