माजी विद्यार्थ्यांचा शाळा उभारणीसाठी पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:36 AM2018-12-28T00:36:50+5:302018-12-28T00:37:06+5:30
शाळेत तब्बल २९ वर्षांनी ते एकत्र आले; मात्र शाळेत काहीच बदल नव्हता. तीच इमारत... फुटलेली कौले... त्यातून आत डोकावणारा सूर्यप्रकाश... हे पाहूुन त्यांचे मन हेलावले.
वडगाव निंबाळकर : शाळेत तब्बल २९ वर्षांनी ते एकत्र आले; मात्र शाळेत काहीच बदल नव्हता. तीच इमारत... फुटलेली कौले... त्यातून आत डोकावणारा सूर्यप्रकाश... हे पाहूुन त्यांचे मन हेलावले. पण, नुसते मन हेलावून दु:खी होणे व नंतर विसरून जाणे एवढ्यापुरतेच न राहता त्यांनी स्वत:च पुढाकार घेतला. आपणच शाळेला एक वर्गखोली बांधून देण्याचा निश्चय केला आणि बसल्या बैठकीत २ लाख ७० हजार रुपये जमवले. एका अर्थाने माजी विद्यार्थी मेळावा विद्यार्थ्यांपेक्षा शाळेसाठीच अधिक आनंददायी ठरला.
वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील स्वातंत्र्य विद्यामंदिर शाळेत सन १९८९-९० या वर्षी दहावीमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा महिनाभरापूर्वी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार झाला. आठवणींच्या चर्चा, हास्यकल्लोळाने विद्यार्थी मेळावा घेण्याचे ठरले. मेळाव्यात शाळेच्या आठवणी प्रत्येकाच्या जागृत झाल्या. शाळेच्या दुरवस्थेबाबत चर्चा झाली. माजी विद्यार्थी काही तरी करू, असे ठरले.
मेळाव्यात पन्नासहून अधिक माजी विद्यार्थी एकत्र जमले होते. प्रत्येकाने आपल्याला जमतील तेवढे पैसे दिले. अरविंद तांबे, वीरेंद्र शितोळे, संतोष निंबाळकर, राहुल ढोले, जीवन बनकर, गणेश फडतरे, सचिन खैरे, लालासो. जायपत्रे, सूरज पटेल, अनिता माने, कल्पना शिंदे यांच्यासह ३० जणांनी रोख रक्कम दिली. उर्वरित माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून एक वर्गखोली बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. विराज राजेनिंबाळकर, राजेंद्र गोलांडे, पांडुरंग पवार यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मेळाव्यात तत्कालीन शिक्षक एन. डी. फडतरे, डी. पी. बोबडे, पी. जे. पाखरे, के. एल. बनकर, एस. एस. सरोदे, डी. ए. बनकर, आर. बी. गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.
प्रत्येकाकडून ऐपतीप्रमाणे आर्थिक मदत
मेळाव्यातील प्रत्येकाने आपल्याला जमतील तेवढे पैसे देण्याचे कबूल केले. काही जणांनी तर रोख रक्कम दिली. उर्वरित माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून एक वर्गखोली बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला. एक समिती त्यासाठी नेमण्यात आली. ठराविक उत्साही विद्यार्थ्यांवर समितीची जबाबदारी सोपविण्यात आली.