..जखमी अवस्थेतील ‘एंजल’ने शस्त्रक्रियेदरम्यान सोडले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 03:33 PM2019-07-15T15:33:07+5:302019-07-15T15:58:48+5:30
ही कहाणी आहे घोरपडी येथील नानाई बागेत जखमी अवस्थेत सापडलेल्या ‘एंजल’ मांजराचे. तिला वाचविण्यासाठी सुमारे सात ते आठ जणांनी आटोकाट प्रयत्न केले होते.....
पुणे : ‘म्याव म्याव’ ओरडत ‘एंजल’ इकडे-तिकडे फिरत होती. तिच्या आवाजात एक प्रकारची वेदना आणि मागील दोन्ही पाय जखमी अवस्थेत असताना समोरील दोन पायांनी ती फरफटत पुढे सरकत होती. हे दृश्य मनाला पिळवटून टाकणारे होते. त्यामुळे एका कुटुंबाने तिला घरात घेऊन तिला दूध प्यायला दिले आणि उपचारासाठी प्रयत्न केले. त्यानंतर डॉक्टरांनीदेखील तिच्यावर ७५ हजार रुपये खर्च असताना सर्व मोफत उपचार करण्याची तयारी दाखवली. मात्र सर्वांचे हे प्रयत्न निष्फळ झाले आणि शस्त्रक्रियेदरम्यानच ‘तिने’ प्राण सोडले.
ही कहाणी आहे घोरपडी येथील नानाई बागेत जखमी अवस्थेत सापडलेल्या ‘एंजल’ मांजराचे. तिला वाचविण्यासाठी सुमारे सात ते आठ जणांनी आटोकाट प्रयत्न केले होते. पण शेवटी शनिवारी रात्री तिचा अंत झाला. ‘एंजल’ला मागील दोन्ही पायांच्या बाजूला कोणीतरी जबर मार दिला होता किंवा एखाद्या दुचाकीने धडक दिली होती. त्यामुळे ‘एंजल’ची मागील दोन्ही पाय आणि शेपटी यामध्ये काहीही संवेदना नव्हत्या. मुख्य मणकाही दोन-तीन ठिकाणी तुटला होता. तसेच सात ते आठ ठिकाणी
फॅक्चर होते.
नानाई बागेतील एका कुटुंबाने ‘एंजल’ला घरात घेऊन दूध प्यायला दिले. त्यानंतर मुंढवा येथील रेडक्रॉस येथील प्राण्यांच्या दवाखान्यात नेले. तिथे ‘एंजल’ची स्थिती पाहून काहीही होऊ शकत नाही, असे सांगितले. त्यानंतर प्राणीप्रेमी हीना परदेशी आणि विशाल यांच्याशी त्या कुटुंबाने संपर्क साधला. त्या दोघांनी ‘एंजल’ची जबाबदारी घेऊन डॉक्टरकडे नेले. त्यांनीच ‘एंजल’ हे नाव ठेवले. डॉक्टरांनी एक्सरे काढल्यानंतर मुख्य मणका तुटला असून, शस्त्रक्रिया गरजेची असल्याचे सांगितले. त्यासाठी सुमारे ७५ हजार रुपये खर्च येणार होता. हीना यांनी निधी जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ‘एंजल’ची अवस्था पाहून डॉक्टरांनीदेखील पैसे न घेता उपचार करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर ‘एंजल’वर शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. परंतु, शस्त्रक्रिया करताना ‘एंजल’ने आपले प्राण सोडले. त्यामुळे सात ते आठ जणांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
.....
..इंजेक्शन देऊन मारून टाका
‘एंजल’ची एकूण अवस्था पाहता अनेकांनी इंजेक्शन देऊन मारण्याचा सल्ला दिला होता. परंतु, हे कोणालाही मान्य नव्हते. कारण एका लहानशा जिवाला अशा प्रकारे मारणे योग्य नसल्याचे मत ‘एंजल’साठी प्रयत्न करणाऱ्यांचे होते. ‘एंजल’साठी हीना परदेशी, विशाल, डॉ. सिद्धेश, डॉ. फिरोज खंबाटा, अॅड. विंदा आणि त्या कुटुंबाने प्रयत्न केले.
मांजरांसाठीचे शेल्टरच नाही
‘एंजल’वर उपचार करण्यासाठी अनेक ठिकाणी चौकशी आणि फोन केले. परंतु, कुठेही मांजरांसाठी शेल्टरची सोय करण्यात आलेली नाही. कोणतीही संस्था किंवा दवाखाना ‘एंजल’ला त्यांच्याकडे ठेवून उपचार करण्यास तयार नव्हता. जखमी श्वान किंवा इतर प्राण्यांवर उपचार करण्याची सोय आणि शेल्टर ठिकठिकाणी आहे. पण मांजरांसाठी नसल्याचे दिसून आले.