संतोष जगताप खून प्रकरणातील जखमी अंगरक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 02:26 PM2021-11-10T14:26:26+5:302021-11-10T14:26:40+5:30
जगतापचे अंगरक्षक जखमी झाल्यावर त्यांचे मुंबईत उपचार सुरु होते
उरुळी कांचन : वाळू व्यावसायिक संतोष जगताप याचा अंगरक्षक मोनुसिंग (वय - ३५) यांचा उपचारादरम्यान बुधवारी (ता.१०) पहाटेच्या सुमारास मुंबईत मृत्यू झाला.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे २२ ऑक्टोंबर रोजी संतोष संपत जगताप (रा. राहू, ता. दोंड) यांच्यावर हॉटेल सोनई समोर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता. तर जगतापच्या अंगरक्षकाकडून संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात स्वागत खैरे हा हल्लेखोर जागीच ठार झाला होता. या हल्ल्यात जगतापचे अंगरक्षक शैलेंद्रसिंग व मोनुसिंग (वय -३५) हे गंभीर जखमी झाले होते. त्यातील मोनूसिंगवर मुंबईत उपचार सुरु होते. मात्र आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेतील मृतांची संख्या आता तीनवर पोहचली आहे.
दरम्यान, संतोष जगताप खून प्रकरणातील आरोपी पवन गोरख मिसाळ (वय २९ वर्षे) आणि महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय २६ दोघेही रा. उरुळीकांचन ता. हवेली) तसेच मुख्य सुत्रधार उमेश सोपान सोनवणे (वय ३४ वर्षे, रा.राहु ता. दौंड जि. पुणे) यांना अटक झाली आहे. तर त्यांना गावठी पिस्तुल पुरविणारे अभिजीत सोपान यादव (रा मेडद, ता. बारामती) आणि आकाश जगन्नाथ वाघमोडे (रा. कुर्डवाडी ता. माढा, जि.सोलापुर) या दोघांनाही लोणी काळभोर पोलिसांनी गजाआड केले आहे.