मुळशी ‘हिट अँड रन’ प्रकरणातील जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू; एकुलता एक मुलगा गमावल्याने हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 01:52 PM2024-09-15T13:52:21+5:302024-09-15T13:52:42+5:30
लहानग्याचे प्राण वाचविण्यासाठी हॉस्पिटलच्या खर्चासाठी गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन पुढाकार घेत लाखो रुपयांची देणगी देखील गोळा केली होती
पिरंगुट : मुळशी तालुक्यातील हिट अँड रन प्रकरणातील गंभीर जखमी झालेल्या प्रेम चव्हाण (वय १४) या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान नऊ दिवसांनंतर मृत्यू झाला. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या प्रेम चव्हाण या विद्यार्थ्याच्या निधनानंतर मात्र मुळशी तालुक्यातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
शुक्रवारी (दि. ६) शेरे (ता. मुळशी) येथील मामासाहेब मोहोळ विद्यालयामध्ये शिकत असलेले प्रेम साहेबराव चव्हाण (इयत्ता ७वी), कार्तिक रामेश्वर मावकर (१४, इयत्ता ८वी) आणि सम्यक प्रमोद चव्हाण (१४, इयत्ता ८वी, सर्व रा. अकोले, ता. मुळशी) हे विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना भरधाव कारने त्यांना उडवले आणि कारचालक तसाच सुसाट निघून गेला. दरम्यान, या अपघातात प्रेम हा गंभीर जखमी झाला हाेता. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले हाेते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कारचालक रूपेश पांडे याला या प्रकरणी पोलिसांनी अटकही केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुधीर घुले करीत आहेत.
‘प्रेम’च्या उपचारासाठी नागरिकांनी दिली हाेती लाखाेंची मदत
प्रेम चव्हाण हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला अजून एक लहान बहीण आहे तसेच त्याचे वडील हे गाडीचालक असल्याने त्याच्या घरची परिस्थिती ही हलाखीची आहे. त्यामुळे प्रेम चव्हाण या लहानग्याचे प्राण वाचविण्यासाठी हॉस्पिटलच्या खर्चासाठी गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन पुढाकार घेत लाखो रुपयांची देणगीदेखील गोळा केली होती. मात्र, त्याचे प्राण न वाचल्याने हळहळ व्यक्त हाेत आहे.