Pune: जखमी वन्यजीवांना मिळाले हक्काचे घर; वन विभागाकडून बावधनमध्ये २२ एकरांवर उपचार केंद्र
By श्रीकिशन काळे | Updated: July 1, 2023 18:06 IST2023-07-01T17:58:03+5:302023-07-01T18:06:32+5:30
राज्यभरातील जखमी प्राणी इथे आणणार...

Pune: जखमी वन्यजीवांना मिळाले हक्काचे घर; वन विभागाकडून बावधनमध्ये २२ एकरांवर उपचार केंद्र
पुणे : जखमी झालेल्या किंवा अनाथ असलेल्या वन्यप्राण्यांना आता पुण्यात हक्काचे घर मिळणार आहे. योग्य उपचारासह तिथे राहण्याची सोय देखील बाधवनच्या वन्य प्राणी उपचार केंद्रात करण्यात आली आहे. राज्यभरातील वन्यप्राण्यांची देखभाल देखील इथे होईल. त्यामुळे राज्यासाठी २२ एकरांमध्ये तयार केलेले हे एकमेव केंद्र आहे. यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला.
सध्या शहरीकरणामुळे वन्यप्राणी-मानव संघर्ष वाढला आहे. तसेच वाहनांच्या धडकेत व इतर अपघातांमध्ये वन्यजीव जखमी होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यांच्यावर उपचार करणे हे काम सोपे नसते. त्यासाठी खास सोय करावी लागते. ही गरज लक्षात घेऊन पुणे वन विभागाच्या वतीने वन्य प्राण्यांच्या उपचारासाठी ‘वन्य प्राणी उपचार केंद्रा’ची (ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर- टीटीसी) निर्मिती केली आहे. बावधन येथील वन क्षेत्रात हे केंद्र साकारले आहे. त्यात अपंगत्व आलेल्या वन्यप्राण्यांची देखभाल आणि संगोपन होईल.
बऱ्याच ठिकाणी अपघातात वन्यजीव जखमी होतात. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ते पुण्यातील बावधन येथे आणणार आहेत. तिथे वैद्यकीय सेवा अद्ययावत केली आहे. पूर्वी वन्यप्राण्यांवर उपचार करण्यासाठी जागा अपुरी पडत होती. म्हणून खास २२ एकरांमध्ये नवीन सेंटर तयार केले आहे.
काय असणार सेंटरमध्ये?
- बावधनला २२ एकर वन क्षेत्रावर सेंटर
- वन्यजीवांवर उपचार करण्यासाठी १६ युनिट
- पशुवैद्यकीय रुग्णालय व प्रशासकीय इमारतीची उभारणी
- वन्यजीवांसाठी शवविच्छेदन कक्ष, बर्निंग शेडही तयार
- जखमी प्राणी ठेवण्यासाठी खास पिंजरेही
- वाघ व मोठ्या प्राण्यांसाठीही सोय
आज वनमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
बावधन येथील वन्यजीव उपचार केंद्र लवकर सुरू व्हावे, यासाठी उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी खास प्रयत्न केले. त्यांनी सातत्याने यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यामुळे हे सेंटर ३० जूनपासून सुरू होत आहे. त्याचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी ५ वाजता होत आहे.