RBIच्या परीक्षेत मराठी मुलं नापास तर अमराठी मुलं पास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 04:48 PM2018-03-15T16:48:56+5:302018-03-15T21:09:50+5:30
रिझर्व्ह बँकेच्या सहायक लिपिक या पदासाठी ऑक्टोबर 2017 मध्ये मुंबईतील 264 जागांसाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप मराठी परीक्षार्थींनी केला आहे. या परीक्षेमध्ये मराठी भाषेचे ज्ञान जाणून घेण्यासाठी एक परीक्षा घेण्यात आली होती. त्यात पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये पास झालेल्या 300 हुन अधिक मराठी परीक्षार्थींना नापास करण्यात आले आहे. तर त्या जागी अमराठी मुलांना पास करण्यात आले आहे.
- राहुल गायकवाड
पुणे : रिझर्व्ह बँकेच्या सहायक लिपिक या पदासाठी ऑक्टोबर 2017 मध्ये मुंबईतील 264 जागांसाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप मराठी परीक्षार्थींनी केला आहे. या परीक्षेमध्ये मराठी भाषेचे ज्ञान जाणून घेण्यासाठी एक परीक्षा घेण्यात आली होती. त्यात पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये पास झालेल्या 300 हुन अधिक मराठी परीक्षार्थींना नापास करण्यात आले आहे. तर त्या जागी अमराठी मुलांना पास करण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या सहायक लिपिक पदासाठी ऑक्टोबर 2017 मध्ये परीक्षा घेण्यात आली. यातील पहिला आणि दुसरा टप्पा आईबीपीएस आणि ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. दुसऱ्या टप्प्यातून 666 परीक्षार्थींची निवड करण्यात आली. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2018 रोजी परीक्षार्थींना मराठी भाषा लिहिता वाचता येते का या बाबतची परीक्षा घेण्यात आली.(language profeciency test)या परीक्षेला प्रत्यक्षात किती गुण आहेत हेही सांगण्यात आले नव्हते. या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला असून यात सुमारे 250 ते 300 मराठी भाषिक परीक्षार्थींना नापास करण्यात आले आहे. त्याचबरोबर हे परीक्षार्थीं का नापास झाले या बाबत विचारणा केली असता, कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.
या परीक्षेला बसलेल्या पूनम आंबोरे म्हणाल्या पहिल्या दोन परीक्षांमध्ये मी चांगल्या गुणांनी पास झाले आहे. तिसरी परीक्षा हि फक्त उमेदवाराला मराठीचे किती ज्ञान आहे यासाठी होती. त्यात साधारण प्रश्न विचारण्यात आले होते. तरीही अनेक मराठी मुलांना यात नापास करण्यात आले आहे. तर त्या जागी अनेक अमराठी मुलांना पास करण्यात आले आहे. पहिल्या दोन परीक्षा पास झालो असताना मराठी भाषेच्या परीक्षेत आम्हाला नापास कसे करण्यात आले या बाबत कुठलीही माहिती देण्यात येत नाही. हा मराठी मुलांवर केलेला अन्याय आहे.
शिवसेनेचे कार्यकर्ते सतिश पानपट्टे म्हणाले, या परिक्षेत मोठ्या प्रमाणावर मराठी परीक्षार्थींना नापास करण्यात आले आहे. ज्या अमराठी परीक्षार्थींना मराठी बोलताही येत नाही असे काहीजन या परीक्षेत पास झाले आहेत. त्यामुळे यात काहीतरी घोटाळा असल्याचा संशय येत आहे. रिझर्व्ह बँकेच्या विरोधात लवकरत युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.