अपंग शिक्षकांवर होतोय अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:44 AM2019-01-07T00:44:14+5:302019-01-07T00:45:27+5:30
जिल्ह्यातील स्थिती : दुर्गम ठिकाणी दिली आस्थापना
नेरे : पुणे जिल्हा परिषद येथे मे २०१८ मध्ये आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना रँडम राऊंडनुसार पदस्थापना दिल्या होत्या. दिव्यांग, अपंग शिक्षकांचाही यामध्ये समावेश होता. शासन निर्णयानुसार अपंग शिक्षकांना सुगम भागातील सोयीच्या शाळा देणे गरजेचे असतानाही अवघड, अतिअवघड क्षेत्रात शाळा दिल्याने दैनंदिन प्रवास जिकिरीचा बनला आहे. एकूणच जिल्ह्यातील अपंग शिक्षकांवर शासनाकडून घोर अन्याय होत असल्याचे चित्र आहे.
शिक्षकांना २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार प्रथम प्राधान्याने अपंग शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने शाळा देणे गरजेचे होते. मात्र तसे करण्यात आले नाही. ही बाब ग्रामविकास मंत्रालय मुंबई यांच्या लक्षात आली. त्यामुळे १० आॅगस्ट २०१८ रोजी शासन पत्र काढून राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अवघड शाळेत पदस्थापना मिळालेल्या दिव्यांग, अपंग शिक्षकांना पदस्थापना बदलून देण्याचे सर्व अधिकार दिले होते. इतर जिल्ह्यांत या पत्रानुसार विनाअट अपंग शिक्षकांना तत्काळ शाळा बदलून देण्यात आल्या. पण पुणे जिल्ह्यात तसे झाले नाही. परिणामी या अपंग शिक्षकांना रुजू असलेल्या दुर्गम क्षेत्रातील शाळांवर जाणे त्रासदायक बनत आहे. प्रशासनाने अपंग शिक्षकांना लवकरात लवकर दुर्गम भागातील पदस्थापना बदलून सुगम भागातील शाळा देण्यात यावी अशी मागणी होत आहे.
पुणे जिल्ह्यात शासकीय आदेशाचे पालन नाही
इतर जिल्ह्यांत या पत्रानुसार विनाअट अपंग शिक्षकांना तत्काळ शाळा बदलून देण्यात आल्या. पुणे जिल्ह्यात मात्र अपंगांना प्रमाणपत्र व शारीरिक तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तपासणी होऊन अहवाल प्राप्त करून २ महिने झाले तरी याबाबत प्रशासनाकडून अपंग शिक्षकांच्या पदस्थापना बदलीबाबत कोणतीही कार्यवाही अद्याप केलेली नाही.