Dattatray Bharane: कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यात सत्ताधार्यांकडून शेतकर्यांवर अन्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 07:05 PM2021-10-10T19:05:14+5:302021-10-10T19:05:23+5:30
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यात पारदर्शक काम होत नसून विरोधकांना नविन सभासदत्व नाहीच. मात्र दिवंगत सभासद वारसाच्या नोंदीही होत नाहीत सभासद शेतकर्यांवर अन्याय करुन कारखाना बिनविरोध झाल्याची आवई केली जात आहे.
कळस : इंदापूर येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याने गाळप झालेल्या ऊसाला इतर कारखान्याच्या तुलनेत टनाला पाचशे रूपये कमी दिले आहेत, या कारखान्यात पारदर्शक काम होत नसून विरोधकांना नविन सभासदत्व नाहीच. मात्र दिवंगत सभासद वारसाच्या नोंदीही होत नाहीत सभासद शेतकर्यांवर अन्याय करुन कारखाना बिनविरोध झाल्याची आवई केली जात आहे. असा आरोप सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केला आहे.
कळस ता इंदापुर येथील दत्ता पेट्रोलियमच्या उद्धघाटन प्रसंगी ते बोलत होते, यावेळी जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, प्रतापराव पाटील, हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ, भरतराजे भोसले, गणेश सांगळे,प्रसाद कांबळे उपस्थित होते.
भरणे यांनी यावेळी सांगितले, कर्मयोगी साखर कारखाना शंकरराव भाऊच्या कारकिर्दीत चांगला चालत होता. मात्र आता त्यामध्ये पारदर्शक काम होत नाही. कारखाना अडचणीत असून सभासदांना इतर कारखान्याच्या तुलनेत ५०० रूपये कमी दिले जात आहेत. कारखाना बिनविरोध झाला असल्याची आवई केली जाते. मात्र याठिकाणी नवीन सभासद करुन घेतले जात नाही. तसेच दिवंगत सभासद वारसाच्या नोंदी ही केल्या जात नाहीत.
इतर कारखान्यात कोणाचीही शिफारस नसली तरी सभासदत्व दिले जाते. त्यामुळे येथे सभासद शेतकर्यांवर अन्याय केला जात आहे. दौंड शुगर या खाजगी कारखान्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. मात्र याच खाजगी कारखान्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. कर्मयोगी कारखान्याच्या तुलनेत पाचशे रुपये अधिकचे दिले. मात्र या कारखान्यालाच केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशीला सामोरे जावे लागत आहे. याचा शेतकरी सभासदांनी निषेध केला पाहिजे.