अर्थसंकल्पात मातंगांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:16 AM2021-03-13T04:16:13+5:302021-03-13T04:16:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळासाठी अंदाजपत्रकात तरतूद नसल्याचे सांगत मातंगांबद्दल राज्य शासन दुजाभाव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळासाठी अंदाजपत्रकात तरतूद नसल्याचे सांगत मातंगांबद्दल राज्य शासन दुजाभाव करत असल्याचा आरोप रिपब्लिकन मातंग आघाडीने केला. मातंगांना लवकरात लवकर न्याय न दिल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देत आघाडीतर्फे गुरुवारी (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली.
आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे, शहराध्यक्ष संदीप गायकवाड, राज्य उपाध्यक्ष शंकर शेलार, रिपाइं शहराध्यक्ष संजय सोनवणे, रिपब्लिकन युवक आघाडी शहराध्यक्ष शैलेश चव्हाण, शहर कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, बाळासाहेब मस्के, खंडू शिंदे, लखन कांबळे, वीरेन साठे, जयश्री डोलारे, अश्विन खुडे आदींनी आंदोलनात भाग घेतला.
राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अंदाजपत्रकात मातंगांच्या सामाजिक आर्थिक, शैक्षणिक विकासासाठी मदतकारक ठरणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळास राज्य सरकारने एक रुपयाची देखील तरतूद केली नाही, असा आरोप हनुमंत साठे यांनी केला. साठे म्हणाले की, या महामंडळातील कथित भ्रष्टाचाराचा बहाणा करीत गेल्या आठ वर्षांपासून या महामंडळास भागभांडवल तरतूद नाही. शासनाने अण्णा भाऊ साठे स्मारक मुंबई आणि अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव कार्यक्रम यासाठी नव्याने शंभर कोटींची तरतूद करावी.
संगमवाडी येथील लहुजी वस्ताद साळवे स्मारकासााठीही शासनाने आर्थिक तरतूद केली नाही. यावरून साळवे आणि अण्णा भाऊ साठे यांच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदानाचा विसर सरकारला पडल्याचे दिसते, असा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
फोटो - जेएमएडीट