केंद्र आणि राज्यातील सरकार सारखेच; शरद पवारांना जाब विचारणार - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 06:41 PM2022-01-19T18:41:10+5:302022-01-19T19:02:33+5:30
काँग्रेसच्या केंद्र सरकारने भूमी अधिग्रहण कायदा केला...
पुणे: शेतकऱ्यांवर अन्याय करण्याच्या बाबतीत केंद्र व राज्य सरकार यांचे एकमत असते. भूमी अधिग्रहण कायद्यातील दुरूस्ती त्यामूळेच झाली. पावसात भिजून शेतकऱ्यांची मते मागणाऱ्या शरद पवारांना (sharad pawar) हे चालते का असा जाब त्यांची भेट घेऊन विचारणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (raju shetty) यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन विकास करण्याचा हा प्रकार आम्ही मुळीच खपवून घेणार नाही, या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करू असा इशाराच शेट्टी यांनी दिला.
पत्रकारांबरोबर बोलताना बुधवारी दुपारी पुण्यात शेट्टी म्हणाले, काँग्रेसच्या केंद्र सरकारने भूमी अधिग्रहण कायदा केला. त्याला नख लावण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. पण मी खासदार असताना व त्यांच्या आघाडीचा भाग असतानाही त्यांना विरोध केला. त्यावेळी शरद पवार, शिवसेना काँग्रेस माझ्याबरोबर होते. त्यामुळे मोदी सरकारला ती दुरूस्ती गुंडाळून ठेवावी लागली.
मात्र आता राज्य सरकार ही दुरूस्ती करत असून त्यानूसार परिपत्रकही जाहीर करण्यात आले. या दुरूस्तीबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, आता शेतकऱ्याला जमिनीच्या बदल्यात मिळणाऱ्या नूकसान भरपाईच्या रकमेत २० टक्के कपात करण्यात आली. बाजारभावाच्या चौपट दराने भरपाई देण्याची तरतूद असताना ती फक्त दोनपट करण्यात आली. यात शेतकऱ्यांचे कितीतरी नूकसान आहे. त्यांच्याच जमिनी घेऊन त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा हा प्रकार आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत ही दुरूस्ती मान्य करणार नाही. सरकारने ही दुरूस्ती त्वरीत मागे घेतल्याचे जाहीर करावे, अन्यथा राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू करू.
पनवेल इथे यासंदर्भात गुरूवारीच बैठक आहे. शरद पवार यांनी पावसात भिजून शेतकऱ्यांना सांभाळण्याचा शब्द दिला आहे. तो शब्द असा पाळणार आहात का, असा प्रश्न त्यांची लवकरच प्रत्यक्ष भेट घेऊन विचारणार आहे असे शेट्टी म्हणाले. रस्ते तसेच अन्य मोठ्या प्रकल्पांना शेतकऱ्यांच्या जमिनी लागतात. त्यांची नूकसान भरपाई मोठी असेल तर प्रकल्पाची किंमत वाढते, त्यासाठी केंद्र सरकारच्या सुचनेवरून राज्य सरकार भूमी अधिग्रहण कायद्यात हा बदल करत आहे असा आरोप शेट्टी यांनी केला. कोटयवधी रूपयांचा भ्रष्टाचार राज्य सरकारमध्ये सुरू आहे. कुठे किती पैसे मूरत आहेत ते बंद करायचे सोडून शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचा हा प्रकार आहे व त्यात केंद्र आणि राज्य सरकार सारखेच भागीदार आहेत अशी टीका शेट्टी यांनी केली.
मुख्यमंत्री ऊपमुख्यमंत्री यांना का नाही भेटणार असे विचारले असता कोणाची कळ दाबायची ते आम्हाला चांगले कळते असे ऊत्तर शेट्टी यांनी दिले. पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला दिवंगत विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.