कार्यालय रिकामे करण्याची इंटकला नोटीस, राष्ट्रवादीपाठोपाठ तुकाराम मुंढे यांचा काँग्रेसला झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 08:37 PM2018-01-16T20:37:09+5:302018-01-16T20:37:22+5:30
काही महिन्यांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित युनियनचे कार्यालय सील केल्यानंतर आता पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी काँग्रेसप्रणित इंटक या संघटनेला कार्यालय रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे.
पुणे - काही महिन्यांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित युनियनचे कार्यालय सील केल्यानंतर आता पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी काँग्रेसप्रणित इंटक या संघटनेला कार्यालय रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पीएमपी संघटनांचे धाबे दणाणले आहेत.
राष्ट्रवादी कामगार युनियनचे कार्यालय ‘पीएमपी’च्या भांडार विभागासमोरील इमारतीत काही वर्षांपासून होते. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिनाभरातच हे कार्यालय रिकामे करण्याची नोटीस संघटनेला बजावली होती. दि. १ सप्टेंबर २०१४ ते ३१ आॅगस्ट २०१७ या कालावधीसाठी करार करण्यात आला होता. मात्र, मुदतीपुर्वी तीन महिने आधीच कार्यालय ताब्यात घेण्यात आले. याला संघटनेच्यावतीने तीव्र विरोधही करण्यात आला. मात्र, प्रशासन कारवाईवर ठाम राहिले. प्रशासकीय कारणासाठी ही इमारती लागणार असल्याने ताब्यात घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने त्यावेळी स्पष्ट केले होते. आता हीच वेळ पीएमपी कामगार संघटनेवर (इंटक) आली आहे. पीएमपी प्रशासनाने सोमवारी इंटकला कार्यालय रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे.
इंटकचे कार्यालय मुख्य इमारतीशेजारील दुसºया इमारतीमध्ये आहे. ते रिकामे करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. काही महिन्यांपासून कार्यालयाचे भाडे थकले आहे. तसेच हे कार्यालय प्रशासकीय कारणासाठी आवश्यक असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आल्याचे समजते. या नोटीसवर संघटनेच्या पदाधिकाºयांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दरम्यान, हे कार्यालय इंटकला १९५९ मध्ये ९९ वर्षांच्या करारावर देण्यात आले आहे. त्यासाठी प्रतिमहिना एक रुपया भाडे आकारले जाते. औद्योगिक विवाद कायद्यांनुसार हा करार झाला आहे. त्यामुळे अशाप्रकारे हा करार मोडणे बेकायदेशीर असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे संघटनेकडून या कारवाईविरोधात कायदेशीर पाऊल उचलले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.