सव्वाशेहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईतांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:08 AM2021-07-10T04:08:18+5:302021-07-10T04:08:18+5:30
पुणे : कोथरूडमधील सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये दरोडा टाकून फरार होत असताना पोलिसांवर हल्ला करणाऱ्या चोरट्यांना न्यायालयाने ...
पुणे : कोथरूडमधील सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये दरोडा टाकून फरार होत असताना पोलिसांवर हल्ला करणाऱ्या चोरट्यांना न्यायालयाने १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी फिल्मी टाईल पाठलाग करून दोघांना अटक केली होती. या सराईत चोरट्यांवर सव्वाशेहून अधिक गुन्हे दाखल आहेत.
बल्लूसिंग प्रभूसिंग टाक (वय ३०) आणि उजालासिंग प्रभूसिंग टाक (वय २७, दोघेही रा. रामटेकडी) असे अटक केलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत. तर या प्रकरणात सोमनाथ नामदेव घारोळे, पिल्लूसिंग कालूसिंग जुन्नी, जलसिंग रजपुतसिंग दुधानी आणि गोरखसिंग गागासिंग टाक (सर्व रा. हडपसर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. सोमवारी (ता. ५) रात्री दोनच्या सुमारास आरोपी हे कोथरूडमधील पंचरत्न सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये दरोडा टाकत होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर रात्रपाळीचे पोलीस अधिकारी व कर्मचारी काही क्षणात घटनास्थळी दाखल झाले. घरफोडी करून जिन्याने उतरत असताना पोलिसांनी चोरट्यांना पकडण्यात प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत एकजण पोलिसांच्या तावडीत सापडला. तर दुसऱ्याने पळ काढला. त्यावेळी पोलिसांनी त्याचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केल्यानंतर पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. बल्लूसिंग याच्यावर चोरीसह विविध प्रकारचे ६३ आणि उजालासिंग याच्यावर ७२ गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून २००८ पासून ते घरफोडीसारखे गुन्हे करीत असल्याचे सरकरी वकील किरण बेंडभर यांनी न्यायालयास सांगितले. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी अॅड. बेंडभर यांनी केली.
---------------------------------------------