पुराव्याची साखळी पूर्ण न झाल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:10 AM2021-04-03T04:10:41+5:302021-04-03T04:10:41+5:30
पुणे : लोणावळा येथील खून प्रकरणामध्ये परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी पूर्ण होत नसल्याने एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सत्र ...
पुणे : लोणावळा येथील खून प्रकरणामध्ये परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी पूर्ण होत नसल्याने एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सत्र न्यायाधीश जी. पी. अगरवाल यांनी हा आदेश दिला.
यशवंत पवार ऊर्फ यशवंत वाघमारे असे निर्दोष मुक्त केलेल्याचे नाव आहे. विजयकुमार वंगलवर (रा. मुंबई) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. १ डिसेंबर २०१५ रोजी लोणावळा परिसरात ही घटना घडली.
वंगलवर यांची हत्या करून त्यांचा मोबाईल व रोख रक्कम चोरल्याचा गुन्हा लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात यशवंत वाघमारे याने मोबाईल व रोख रक्कम चोरण्याच्या उद्देशाने वंगलवर यांच्या डोक्यावर व हातावर कोयत्याने वार करून हत्या करून त्यांचा मोबाईल संतोष बापू पवार याला विकल्याचे निष्पन्न झाले होते. सदरच्या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी एकूण १० साक्षीदार तपासले. परंतु मोबाईल मयताचा असल्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा अभिलेखावर नसल्याने तसेच मोबाईलचे सी. डी. आर. व एस. डी. आर. पोलिसांनी दाखल न केल्याने सदर खटल्यात परिस्थितीजन्य पुराव्याची पूर्ण साखळी जोडण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला. त्यामुळे वाघमारे याची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. मयूर दोडके यांनी काम पाहिले.