कोंढवा परिसरातील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबध्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 08:50 PM2018-04-24T20:50:29+5:302018-04-24T21:38:58+5:30
गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा होण्याची चिन्हे न दिसल्याने सराईत गुन्हेगारावर पोलिसांनी ही स्थानबध्दतेची कारवाई केली.
पुणे: कोंढवा परिसरात शस्त्र बाळगत दहशत निर्माण करणे, घातक शस्त्राने मारामारी, गंभीर दुखापत, जबरी चोरी, खंडणी वसुली इत्यादी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला वारंवार सुधारणा करण्याची सुचना करुन देखील त्यात परिवर्तन न केल्यामुळे त्याला एका वर्षासाठी येरवडा येथे स्थानबध्द करण्यात आले.
ओंकार चंद्रशेखर कापरे ( वय.२२, व्यवसाय- बेरोजगार, रा. अलका निवास, संत गाडगे महाराज शाळेजवळ, कोंढवा ) असे स्थानबध्द करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सातत्याने कापरे यांच्या प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा होण्याची चिन्हे न दिसल्याने त्याच्यावर पोलिसांनी ही स्थानबध्दतेची कारवाई केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद गायकवाड यांनी दिली.