स्वाईन फ्लूच्या विषाणुंपासून मिळणार संरक्षण ; पुण्यातील डाॅक्टरचा अनाेखा मास्क
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 07:24 PM2018-10-01T19:24:35+5:302018-10-01T19:53:17+5:30
संसर्गजन्य राेगांपासून संरक्षण मिळवणारा अनाेखा मास्क ससूनच्या डाॅक्टरांनी तयार केला असून येत्या काळात नागरिकांना ताे उपलब्ध हाेणार अाहे.
राहुल गायकवाड
पुणे : स्वाईन फ्लू, क्षयराेग यांचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले अाहेत. त्याचबराेबर प्रदूषणामुळे हवा दूषित झाल्याने अनेक श्वसनाच्या अाजारांचा सामना नागरिकांना करावा लागत अाहे. यापासून संरक्षण करण्यासाठी ससूनच्या श्वसनराेग विभागाचे प्रमुख संजय गायकवाड यांनी दुहेरी संरक्षण करणारा मास्क तयार केला असून या संशाेधनाचे पेटंटही त्यांनी मिळवले अाहे.
स्वाईन फ्लू महाराष्ट्रात माेठ्याप्रमाणावर पसरत अाहे. विशेषतः नाशिक अाणि पुण्यात स्वाईन फ्लू चे सर्वाधिक रुग्ण अाढळून अाले अाहेत. या रुग्णांमध्ये दिवसेदिंवस वाढ हाेत अाहे. साधारण जून, जुलै हे महिने स्वाईन फ्लू पसरण्यासाठी अनुकूल असल्याने या काळात याचे अधिक रुग्ण अाढळतात. पुण्यात साेमवारी (1 अाॅक्टाेबर) 5 हजार सातशे 95 नागरिकांची स्वाईन फ्लूची तपासणी करण्यात अाली अाहे. त्यातील 278 रुग्णांना टॅमी फ्लूचे अाैषध देण्यात अाले असून 11 रुग्णांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात अाले अाहे. स्वाईन फ्लू बराेबरच इतर हवेतून पसरणाऱ्या राेगांचे रुग्ण वाढत अाहेत. वाहनातून, कारखान्यांमधून निघणारा विषारी धूर यांमुळे नागरिकांच्या फुफ्फुसाची क्षमता कमी हाेत चालली अाहे. सध्या बाजारात विविध मास्क असले तरी ते इतके प्रभावी नाहीत. हाच विचार करत डाॅ. संजय गायकवाड अाणि त्यांच्या पत्नी विजया गायकवाड यांनी संशाेधन करुन पुर्नवापर करतायेण्याजाेगा रेस्पीरेटर मास्क तयार केला अाहे. या मास्कवर डाॅ. गायकवाड गेल्या तीन वर्षांपासून संशाेधन करत हाेते. या मास्कची बॅक्टेरिअल फिल्टरेशन एपीगसी ही शंभर टक्के अाहे. तसेच 0.3 मायक्राेनचे हवेतीन दूषित कण 95 टक्क्यांपर्यंत राेखले जातात.
मास्कची अावरण कायम वापरता येणार असून त्यातील फिल्टर केवळ 24 तासांनी बदलावा लागणार अाहे. या मास्कचे वैशिष्ट म्हणजे डबल फिल्टरेशन. या मास्कच्या वापरामुळे वापर करणाऱ्याला शुद्ध हवा मिळणार असून हवेतील जंतू तसेच प्रदूषणापासून संरक्षण हाेणार अाहे. त्याचबराेबर एखाद्याला श्वसनाचा अाजार असल्यास त्याने हा मास्क वापरल्याने ती व्यक्ती खाेकल्यास किंवा शिंकल्यास जंतू हे हवेत पसरणार नाहीत. त्यामुळे इतरांना श्वसनाचा अाजार हाेण्याचा धाेका टळू शकताे. डाॅ. गायकवाड यांनी या मास्कच्या चाचण्या घेतल्या असून त्या यशस्वी ठरल्या अाहेत. येत्या तीन महिन्यांमध्ये हा मास्क नागरिकांना बाजारात मिळू शकणार अाहे.
डाॅ. गायकवाड म्हणाले, सध्या हवेतील प्रदूषणाची पातळी कमालीची वाढत अाहे. त्यामुळे श्वसनाच्या राेगांनी ग्रासलेल्या रुग्णांची संख्याही वाढत अाहे. स्वाईन फ्लूचा धाेकाही वाढला अाहे. त्यामुळे यापासून संरक्षण मिळविण्यासाठी या मास्कची निर्मिती करण्यात अाली अाहे. हा मास्क दूषित हवेतल्या जैविक तसेत रासायनिक जतूंपासून संरक्षण देताे. हा पुर्नवापर करता येण्याजाेगा मास्क असल्याने वारंवार नागरिकांना ताे खरेदी करावा लागणार नाही. केवळ यातील फिल्टर बदलावे लागणार अाहे. तसेच यात डबल फिल्टरेशन असल्याने दुहेरी संरक्षण नागरिकांना मिळणार अाहे. खासकरुन लांबचा प्रवास करणारे , ट्रफिक पाेलीस, स्वच्छता कर्मचारी यांना या मास्कचा उपयाेग हाेणार अाहे. गर्दीच्या ठिकाणी हा मास्क वापरल्यास हवेतून पसरणाऱ्या राेगांपासून संरक्षण मिळवता येणार अाहे.