सोशल मीडिया ग्रृपद्वारे गांधी विचारांवरील पुस्तकनिर्मितीचे अभिनव पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 11:00 PM2019-11-25T23:00:00+5:302019-11-25T23:00:02+5:30
सध्याच्या काळात सोशल मीडियाचा दुधारी अस्त्रासारखा वापर केला जात आहे..
नम्रता फडणीस-
पुणे : सध्याच्या काळात सोशल मीडियाचा दुधारी अस्त्रासारखा वापर केला जात आहे. संवादाचे माध्यम म्हणून जरी त्याच्याकडे पाहिले जात असले तरी अपप्रचार, गैरसमज परविण्याचेही ते आगार बनले आहे, हेही तितकंच खरं आहे. पण सोशल मीडियाचाही विधायक पद्धतीने वापर केला जाऊ शकतो हे 'नोइंग गांधीजम ग्लोबल फ्रेन्ड्स' या ग्रृपने सिद्ध करून दाखविले आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जनमानसात मलीन करण्यात आलेली प्रतिमा सुधारण्यासाठी या सोशल मीडिया ग्रृपने चळवळ उभारली आहे. परंतु केवळ एवढ्यावरच न थांबता या ग्रृपने ’एक धैर्यशील योद्धा: महात्मा गांधी’ या पुस्तकाची निर्मिती करून एकप्रकारचा आदर्श निर्माण केला आहे. एका सोशल मीडिया ग्रृपने सकारात्मक दृष्टीकोनातून पुस्तकाची निर्मिती करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.
अनेक अपप्रचारांमधून महात्मा गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जातोय. ही प्रतिमा सुधारण्यासाठी तीन ते चार वर्षांपूर्वी जनमानसामधून एक चळवळ उभी राहिली ती गांधी समजून सांगण्याची. ‘ 'नोइंग गांधीजम ग्लोबल फ्रेन्ड्स’ या नावाने सोशल मीडियावर सुरू झालेल्या या चळवळीने अनेकांचे मतपरिवर्तन केले आहे. एखाद्या व्यक्तिबद्दल कुणीतरी काहीतरी सांगते आणि आपल्याला ते खर वाटते. मग त्यांच्याबद्दल बिनधास्तपणे खोटा प्रचार सुरू केला जातो. अगदी ज्यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केले, त्यांनाही एका क्षणात निकाली काढले जाते. काहीही माहिती नसताना, त्याची शहानिशा न करता मेसेज पुढे पाठविले जातात आणि मग अपु-या माहितीअभावी ट्रोलिंग सुरू होते. जनमानसात विशेषत: युवापिढीमध्ये गैरसमजाचे बळी ठरलेल्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने नाव प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते गांधी यांचे. गांधी यांनी देशासाठी दिलेले योगदान, सत्य,अहिंसा या तत्त्वांवरची त्यांची वैचारिक मांडणी याकडे दुर्लक्ष करून गांधीजींबददल जाणीवपूर्वक गैरसमज पसरविले जात आहेत. चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून हे गैरसमजदूर व्हावेत, यासाठी ही चळवळ उभारण्यात आली. युवकांच्या मनातील प्रश्न जाणून घेण्याबरोबरच गांधींजींबददल सुरू असलेल्या अपप्रचाराला मूठमाती देण्याचा प्रयत्न या चळवळीद्वारे केला जात आहे.
----------------------------------------------------------
पुस्तकाचे लेखक-संकलक संकेत मुनोत म्हणाले, महात्मा गांधी यांचे अहिंसा,सत्य, महिला सबलीकरण, धर्म आणि अनेक बाबतीतले विचार, गांधीजींचा जागतिक प्रभाव, गांधीजींबददलचे प्रमुख गैरसमज आणि त्यांची उत्तरे उदा: 55 कोटी, फाळणी, भगतसिंगांची फाशी,गांधीजींवर झालेले 1934 पासूनचे हल्ले, नेहरू,पटेल, अहिंसा इ., गांधीजींचे दुर्मिळ फोटो आणि गांधीविचारांमधून प्रेरणा घेऊन कार्य करणारे तरूण आणि त्यांचे उपक्रम या गोष्टींचा पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. या पुस्तकाला गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांची प्रस्तावना लाभली आहे. पुस्तकाची संकल्पना संजय रेंदाळकर यांची आहे. आजमितीला नोईंग गांधीझम ग्लोबल फ्रेंडसचे फेसबुकवर 10 हजार आणि व्हॉटसअपवर अडीच हजार सदस्य आहेत.