‘कोरोनील’ या औषधाने कोरोना बरा होतो, असा दावा करणाऱ्या बाबा रामदेव यांची चौकशी करा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 10:41 AM2022-01-07T10:41:35+5:302022-01-07T10:41:42+5:30
कोरोना बरा करणारे औषध ‘कोरोनील’ शोधून काढल्याचा बेकायदेशीर आणि खोटा दावा रामदेव बाबाने २४ जून २०२० रोजी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत करून संपूर्ण देशाची दिशाभूल केली
पुणे : ‘कोरोनील’ या ‘पतंजली’च्या औषधाने कोरोना बरा होतो, असा दावा करणाऱ्या बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांची पोलीस चौकशी करावी, असे आदेश जुन्नर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. व्ही. सपकाळ यांनी दिले आहेत. याबाबत मदन कुर्हे यांनी बाबा रामदेव यांच्या विरोधात ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत दाखल केलेल्या खासगी फौजदारी तक्रारीची न्यायालयाने दखल घेऊन हा आदेश दिला आहे. कोरोना बरा करणारे औषध ‘कोरोनील’ शोधून काढल्याचा बेकायदेशीर आणि खोटा दावा रामदेव बाबाने २४ जून २०२० रोजी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत करून संपूर्ण देशाची दिशाभूल केली, असा आरोप तक्रारीतून करण्यात आलेला आहे.
जुन्नरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. व्ही. सपकाळ यांनी जुन्नर पोलिसांना या प्रकरणाचा तपास करून ७ फेब्रुवारी २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना लॉकडाऊन कालावधीत बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे आचार्य बाळकृष्ण यांच्याविरुद्ध त्यांच्या खोट्या आणि दिशाभूल करणा-या दाव्यांविरुद्ध कोरोनील संदर्भात दाखल झालेला महाराष्ट्र राज्यातील हा एकमेव खटला आहे.
मदन कुर्हे यांनी ६ जुलै २०२० रोजी जुन्नर न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली होती. कोरोना महामारीच्या आरोग्य संकटाच्या काळात असे खोटे दावे करणे यामागे भीतीच्या सावटाखाली असलेल्या भारतीय नागरिकांकडून केवळ पैसा कमविण्याच्या व्यापारी उद्देश होता, असा आरोप तक्रार अर्जातून करण्यात आला आहे.
ॲड. असीम सरोदे म्हणाले की, कायद्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तसेच कायदेशीर व्यवसाय करण्याच्या हक्कांचा प्रत्येकाने जबाबदाऱ्यांसह व वाजवी बंधनांची जाणीव ठेवून वापर केला पाहिजे.