पुण्यात स्वच्छतागृहात विजेच्या धक्क्याने महिलेच्या झालेल्या मृत्यूची चौकशी व्हावी, आ. डॉ. नीलम गो-हे यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 07:01 PM2018-01-11T19:01:45+5:302018-01-11T19:02:08+5:30
शहरातील कात्रज परिसरात एका महिलेचा २ जानेवारी २०१८ रोजी विजेच्या उघड्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाल्याबद्दल चौकशी करावी व शहरात याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या, स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आ. डॉ. नीलम गो-हे यांनी आज निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे - शहरातील कात्रज परिसरात एका महिलेचा २ जानेवारी २०१८ रोजी विजेच्या उघड्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाल्याबद्दल चौकशी करावी व शहरात याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या, स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आ. डॉ. नीलम गो-हे यांनी आज निवेदनाद्वारे केली आहे.
या घटनेसोबतच पुणे महापालिकेला आलेला तीन कोटी रुपयांचा आमदार निधी परत द्यावा लागल्याच्या बाबीचा उल्लेख करून याचा पाठपुरावा त्या मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. अशा प्रकारे आमदारांचा निधी परत जाणे म्हणजे एक प्रकारे आमदारांच्या विशेषाधिकारांचा भंगच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिलेचा मृत्यू झाल्याबद्दलच्या घटनेवर त्या म्हणतात, '२ जानेवारी २०१८ रोजी पुण्यातील कात्रज परिसरात एक कष्टकरी व सर्वसाधारण कुटुंबातील महिला सायंकाळी घरी परतत असताना तिला नैसर्गिक विधीकरिता गेली असता तिथे असलेल्या विजेच्या उघड्या तारेच्या संपर्कात आल्याने ती जागेवरच मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. ही अत्यंत क्लेशकारक व दुःखदायक घटना असल्याचे सांगून पुण्यासारख्या शहरातही नागरिकांना वीज जोडणी करताना खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
या घटनेची वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून त्वरित दखल घेतली गेली नसल्याचे नमूद करून या घटनेनंतर पाच दिवस होऊनही याचा अहवाल स्थानिक विद्युत निरीक्षकांनी का दिला नाही, याची विचारणा केली आहे. सदर महिलेच्या कुटुंबीयांना काही ठोस स्वरूपाची मदत करण्याची गरज व पुणे शहरात महिला स्वच्छतागृह पुरेशा व स्वच्छ प्रमाणात असावी, असे सांगून पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत सप्टेंबर २०१७ मध्ये झालेल्या पुणे शहराच्या विविध प्रश्नावर झालेल्या बैठकीत शहरातील शाळांमध्ये असलेली स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यावर लवकरच कार्यवाही केली जाईल या आश्वासनाची पूर्ती करण्यात आली नसल्याचे नमूद केले आहे.
पुणे शहर व सर्व उपनगरांत महिलांसाठी पुरेशी व स्वच्छ स्वरुपाची स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत या करिता त्वरित पावले उचलण्यात यावीत. त्याचबरोबर महिलांना शहरात स्वच्छतागृहे उपलब्ध होण्याकरिता विविध स्वयंसेवी संस्था, पेट्रोल पंप चालक संघटना यांच्यासमवेत समन्वयाच्या माध्यामातून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.