बांधकामाला पाणी वापरण्याची चौकशी

By admin | Published: March 17, 2016 03:26 AM2016-03-17T03:26:11+5:302016-03-17T03:26:11+5:30

शहराला सर्वत्र पाणीटंचाईच्या झळा पोहोचत असताना महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाला पिण्याचे पाणी वापरले जात असल्याच्या प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित

Inquire to use water for construction | बांधकामाला पाणी वापरण्याची चौकशी

बांधकामाला पाणी वापरण्याची चौकशी

Next

पुणे : शहराला सर्वत्र पाणीटंचाईच्या झळा पोहोचत असताना महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाला पिण्याचे पाणी वापरले जात असल्याच्या प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी दिले आहेत. शहरामध्ये बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई असताना महापालिका मुख्य इमारतीच्या बांधकामासाठीच पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने मंगळवारी उजेडात आणला. ऐन पाणीटंचाईच्या काळात महापालिकेकडूनच पाण्याची मोठी नासाडी केली जात असल्याच्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाकडून इमारतीच्या बांधकामासाठी झऱ्याचे पाणी वापरले जात असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात नळाला टॅप करून पाइपने बांधकामाला पाणी मारले जात असल्याचे दिसून आले होते. त्याचे फोटोही स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी काढले आहेत. आयुक्तांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल संबंधित विभागाकडून मागविला आहे. त्यामध्ये दोषी आढळून आलेल्या अधिकाऱ्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा झाल्याने १ सप्टेंबरपासून शहराच्या पाण्यात ३० टक्के कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्या वेळी पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकाम, वॉशिंग सेंटरसाठी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर पिण्याचे पाणी गाडी धुण्यासाठी वापरणे, पाण्याच्या टाक्या भरून वाहणे अशा प्रकारे पाण्याचा गैरवापर होत असल्याचे आढळून त्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत. पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. महापालिका मुख्य इमारतीच्या बांधकामासाठी उघडपणे नळाला पाइप जोडून त्यातून पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरले जात आहे. महापालिकेकडूनच पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी केला जात असल्याने उजेडात आल्याने पालिका प्रशासन पाणीटंचाईबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ३०० जलतरण तलाव जुलैेपर्यंत बंद राज्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सर्व जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश राज्य शासनाकडून महापालिकांना देण्यात आले आहेत, या पार्श्वभूमीवर शहरातील महापालिकेचे व खासगी असे ३०० जलतरण तलाव बंद होणार आहेत. राज्य शासनाचे आदेश प्राप्त झाले असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्यये निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा झाल्याने १ सप्टेंबरपासून शहराच्या पाण्यात ३० टक्के पाणीकपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचवेळी जलतरण तलावांना पिण्याचे पाणी वापरले जाऊ नये, असे आदेश कुणाल कुमार यांनी दिले होते. त्यामुळे इतर ठिकाणांहून पाणी आणून शहरातील जलतरण तलाव सुरू होते, मात्र राज्य शासनाच्या आदेशानुसार हे तलाव आता बंद होणार आहेत. शहरात महापालिकेचे २१, तर तसचे २७५ खासगी जलतरण तलाव आहेत. जलतरण तलावासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने शासनाकडून ते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Inquire to use water for construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.