राममंदिर विकासासाठी उद्योगपतींकडून विचारणा; स्वामी गोविंददेव गिरी यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 12:49 AM2021-01-01T00:49:30+5:302021-01-01T06:58:48+5:30
अयोध्या परिसराच्या विकासासाठी एका ‘बड्या’ कुटुंबाने विचारणा केली होती.
पुणे : “अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराचा खर्च किती असावा याचा विचार आम्ही केलेला नाही. मंदिराच्या आतील बाजूच्या कामासाठी ३०० ते ४०० कोटी खर्च होईल, असा माझा अंदाज आहे. मंदिर परिसराच्या विकासासाठी अकराशे कोटी रुपये लागू शकतील,” असा अंदाज श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
अयोध्या परिसराच्या विकासासाठी एका ‘बड्या’ कुटुंबाने विचारणा केली होती. मात्र, हे नाव मी जाहीर करणार नाही, असे सांगून ते म्हणाले की, देशातील सामान्य व्यक्तीच्या दानातून हे मंदिर उभारले जावे, ही बाब सामान्य व्यक्तीच्या रामभक्तीच्या दृष्टीने समाधान देणारी आहे. मंदिरासाठी जनतेकडून दान स्वीकारण्याचा मूळ हेतू हाच आहे. स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले, की अयोध्या मंदिरासाठी येत्या मकर संक्रांतीपासून माघ पौर्णिमेपर्यंत निधी संकलन केले जाणार आहे. यासाठी एक हजार रुपये, शंभर रुपये आणि दहा रुपयांची कूपन छापली आहेत.