गॅस शवदाहिनी घोटाळ्याची चौकशी
By admin | Published: July 7, 2017 03:41 AM2017-07-07T03:41:59+5:302017-07-07T03:41:59+5:30
सांगवी स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनी घोटाळ्याप्रकरणी अखेर पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह पाच जणांची खातेनिहाय
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : सांगवी स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनी घोटाळ्याप्रकरणी अखेर पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह पाच जणांची खातेनिहाय चौकशी करण्याचा
आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले असून चौकशी पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
महापालिकेतील पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय नारायण कुलकर्णी, उपअभियंता मनोहर टेकचंद जावरानी, कनिष्ठ अभियंता विकास विठ्ठल घारे, लेखाधिकारी किशोर बाबूराव शिंगे आणि उपलेखापाल उषा सतीश थोरात अशी खातेनिहाय चौकशी सुरू केलेल्यांची नावे आहेत.
सांगवीसह शहरातील विविध पाच स्मशानभूमींत गॅस शवदाहिनी बसविली होती. यासाठी दहा कोटी रुपयांचा खर्च आला. गॅस शवदाहिनी बसविण्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सीमा सावळे यांनी केला होता. त्यानंतर तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने चौकशी समिती नेमली होती. समितीत सह आयुक्त दिलीप गावडे, सह शहर अभियंता अयुबखान पठाण आणि मुख्य लेखापाल राजेश लांडे यांचा समावेश होता. या चौकशीत नियमाचे उल्लंघन केल्याचे ताशेरे ओढले होते. पालिकेत सत्तांतरानंतर सीमा सावळे यांनी चौकशीचा आग्रह धरला होता.
महापालिकेची आर्थिक फसवणूक
‘सांगवी येथील गॅस शवदाहिनी खरेदी प्रक्रिया राबविलेली आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी आदेशात म्हटले आहे. इतर पाच ठिकाणांची निविदा प्रक्रिया निष्काळजीपणे अभ्यास न करता प्रस्तावित केली. त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान व फसवणूक झाले असल्याचे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे. पंधरा दिवसांत चौकशी पूर्ण करून दोषारोपत्र दाखल करण्याच्याही सूचना दिल्या.