झाकीर नाईक देणगी बाबतच्या चौकशीत काही आढळले नाही; संजय राऊतांच्या आरोपांवर विखे पाटलांचे स्पष्टीकरण
By नितीन चौधरी | Published: June 22, 2023 05:10 PM2023-06-22T17:10:48+5:302023-06-22T17:11:19+5:30
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा येथील संस्थेला साडेचार कोटींची देणगी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता
पुणे: देशद्रोहाचे आरोप असलेला व सध्या फरारी असलेला वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईक याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा येथील संस्थेला साडेचार कोटींची देणगी दिल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर ही देणगी कायदेशीर दृष्ट्या नियमित असून यासंदर्भात यापूर्वीच ईडीने देखील चौकशी केली होती. त्यात कोणतेही तथ्य आढळले नाही असा खुलासा महसूल मंत्री विखे पाटील यांनी केला.
पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते. नाईक याने विखे पाटील यांच्या संस्थेला साडेचार कोटींची देणगी दिल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती त्याबाबत विखे पाटील यांनी आज हा खुलासा केला.
नाईक यांनी प्रवरा संस्थेला साडेचार कोटींची देणगी दिली होती. अशी कबुली विखे यांनी यावेळी केली मी त्या संस्थेचा घटक असल्याने ती जबाबदारी झटकणार नाही. मात्र यासंदर्भात त्याचवेळी केंद्रीय यंत्रणांनी तसेच या प्रकरणाची चौकशी केली होती. त्यात कोणतीही अनियमितता आढळली नाही त्यामुळे हा विषय तिथेच संपला आहे. या संदर्भात अजूनही काही शंका असल्यास मीच पिढीला पत्र देऊन चौकशीची मागणी करतो असेही ते यावेळी म्हणाले. देणगी दिली त्यावेळेस नाईक याच्यावर देशद्रोहाचे कोणतेही आरोप नव्हते. मात्र त्यानंतर झालेल्या चौकशी त्याच्यावर हे आरोप ठेवण्यात आले देशद्रोह्याकडून देणगी घेतल्याचा आरोप त्यांनी यावेळी सपशेल फेटाळून लावला.
राऊत यांनी विखे पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांवर ते म्हणाले संजय राऊत यांचे माझ्यावर सध्या प्रेम भलतेच वाढले आहे. मात्र ते जे रोज सकाळी उठून बरळतात याचा अर्थ त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत अनिमित्त झाल्याचा आरोप केला याबाबत विखे म्हणाले की घोटाळेबाजांनी केलेल्या आरोपांबाबत खुलासा करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही ज्या अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या झाल्या अशांनीच मॅप मध्ये दाद मागितली आहे. त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल.