संबोधी संस्थेची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:12 AM2021-04-09T04:12:17+5:302021-04-09T04:12:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) माध्यमातून राज्यातील विविध संस्थांना प्रशिक्षण देण्यासाठी ...

An inquiry will be held into the organization | संबोधी संस्थेची होणार चौकशी

संबोधी संस्थेची होणार चौकशी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) माध्यमातून राज्यातील विविध संस्थांना प्रशिक्षण देण्यासाठी नेमले आहे. औरंगाबाद येथील संबोधी संस्थेत स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण दिले जात होते. मात्र, अनियमिततेमुळे या संस्थेची समाजकल्याण आयुक्तालयामार्फत चौकशी करणार आहे.

एमपीएससी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसंबंधी प्रशिक्षण देण्यासाठी या संस्थेसोबत करार करण्यात आला होता. त्यानुसार दहा महिन्याच्या कालावधीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी या संस्थेवर होती. प्रत्येक विद्यार्थ्याला ९ हजार रुपये विद्यावेतन आणि संस्थेला ९ हजार रुपये देण्यात येतात. १०० विद्यार्थ्यांची एक बॅच याप्रमाणे दोन बॅच होत्या. गेल्या दहा महिन्यांपासून त्यांचे प्रशिक्षण सुरु होते. लॉकडाऊनमध्येही ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. साधारण ऑक्टोबरमध्ये या ठिकाणचे प्रशिक्षण बंद केले आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांची ८० टक्के उपस्थिती असणे बंधनकारक होते. मात्र, काही विद्यार्थी उपस्थित नसताना त्यांचे विद्यावेतन काढल्याचे निदर्शनास आल्याने अनियमिततेमुळे संस्थेबद्दल तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे या संस्थेची समाज कल्याण आयुक्तालयामार्फत चौकशी करणार आहे. तसेच चौकशीत तथ्य आढळल्यास या संस्थेला काळ्या यादीत टाकणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

प्रत्येक कोर्ससाठी साधारण १०० विद्यार्थी निवडले होते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना विद्यार्थ्यांना सोयीसुविधा मात्र त्या तुलनेत पुरविण्यात येत नव्हत्या असा आरोप होता. बार्टी आणि समाजकल्याण विभागाकडे आलेल्या तक्रारींमध्ये प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने या संस्थेची चौकशी करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतल्याचे समजते. चौकशीत या संस्थेने आतापर्यंत घेतलेल्या प्रशिक्षण कोर्स आणि विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनातील काही महत्त्वाचे मुद्दे समोर येण्याची शक्यता असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात संबोधी संस्थेशी संपर्क साधण्याचा पयत्न केला मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: An inquiry will be held into the organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.