७०५ वर्षे जुना रामदेवराय यादवांचा शिलालेख सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 03:05 AM2018-08-26T03:05:05+5:302018-08-26T03:05:27+5:30
तळेगाव ढमढेरे येथे एका गढीचे खोदकाम करताना ७०५ वर्षांपूर्वीचा शिलालेख सापडला. राजा रामदेवराय याच्या काळातील हा शिलालेख असून,
पुणे : तळेगाव ढमढेरे येथे एका गढीचे खोदकाम करताना ७०५ वर्षांपूर्वीचा शिलालेख सापडला. राजा रामदेवराय याच्या काळातील हा शिलालेख असून, त्यामुळे पुणे परिसराच्या इतिहासावर नवा प्रकाश पडला आहे असे ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले.
या शिलालेखाची उंची ७ फूट १ इंच, रुंदी २० इंच, तर जाडी १६ इंच आहे. त्यावर मध्यभागी शिवलिंग कोरलेले आहे. डाव्या बाजूस सूर्य व उजव्या बाजूस चंद्र आहे. त्यावर १२ ओळी आहेत. रामदेव राय यांचा त्यात प्रताप चक्रवर्ती रामचंद्र देव असा उल्लेख आहे. प्रांत अधिकारी सामळ सदू आणि स्थानिक कारभारी गोदई नाईकांचा त्यावर उल्लेख आहे.
बलकवडे यांनी सांगितले की, इसवी सन १२९४ मध्ये रामदेव राय यांचा अल्लाउद्दीन खिलजी याने पराभव केल्याचा इतिहास ज्ञात आहे, मात्र त्यानंतर त्यांचे सगळे साम्राज्य लयाला गेले असे सांगण्यात येते ते चूक असल्याचे या शिलालेखावरून दिसून येते.