सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जेवणात आढळल्या अळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 04:27 PM2019-03-19T16:27:58+5:302019-03-19T16:46:56+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरीमध्ये जेवत असताना विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळून आल्या आहेत.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरीमध्ये जेवत असताना विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळून आल्या आहेत. सातत्याने असे प्रकार समाेर येत असल्याने विदयार्थी संतप्त झाले असून त्यांनी रिफेक्टरी चालकाला याचा जाब विचारला. विद्यापीठ प्रशासनाने रिफेक्टरी चालकाला विद्यार्थ्यांना तीन दिवस गाेड पदार्थ देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु रिफेक्टरीच्या जेवणाच्या दर्जाबाबत वारंवार आंदाेलने करुन देखील निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याने विद्यार्थी संघटना संतप्त झाल्या आहेत.
आज दुपारी रिफेक्टरीमध्ये जेवणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना फ्लाॅवरच्या भाजीत आळ्या आढळून आल्या. याआधी देखील जेवणात विद्यार्थ्यांना आळ्या आढळून आल्या हाेत्या. आज पुन्हा अळ्या आढळल्याने विद्यार्थ्यांनी याचा जाब रिफेक्टरी चालकाला विचारला. त्यानंतर विद्यार्थ्यांना तीन दिवस गाेड पदार्थ जेवणात देण्याचे रिफेक्टरी चालकाने मान्य केले आहे. त्यानुसार उद्या श्रीखंड, गुरुवारी जिलेबी आणि शुक्रवारी आम्रखंड देण्याचे मान्य करण्यात आले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना गाेड पदार्थ देऊन उपयाेग हाेणार नाही, जेवणाच्या दर्जाबाबात देखील सुधारणा व्हायला हवी अशी मागणी आता विद्यार्थी संघटना करत आहेत.
याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विद्यापीठ उपाध्यक्ष विकास खंडागळे म्हणाला, याआधी देखील अनेकदा जेवणामध्ये अळ्या आढळल्या आहे. फ्लाॅवर आणि इतर भाज्यांमध्ये वारंवार अळ्या आढळत असल्याने त्या भाज्या टाळाव्यात असे विद्यार्थ्यांकडून सूचविण्यात आले हाेते. तरीही त्याच भाज्या विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. त्यातच आज पुन्हा फ्लाॅवरच्या भाजीत अळी सापडली. हे लक्षात आले तेव्हा 100 ते 150 विद्यार्थी जेवून गेले हाेते. त्यामुळे आम्ही रिफेक्टरी चालकाला जाब विचारला. चालकाने दंड म्हणून विद्यार्थ्यांना तीन दिवस गाेड पदार्थ देण्याचे मान्य केले आहे.
दरम्यान याप्रकरणी लक्ष घालण्यात येईल आणि याेग्य ती कारवाई करण्यात येईल असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.