सासवडचा कचरा सासवडमध्येच जिरवा

By admin | Published: April 21, 2016 01:11 AM2016-04-21T01:11:23+5:302016-04-21T01:11:23+5:30

शहरांनी आपला कचरा आपल्याच हद्दीत छोटे-छोटे बायोगॅस व कंपोस्ट प्रकल्प उभारून जिरवावा, असे राज्य शासनाचे धोरण आहे

Insert sausages of sausage in saasavad | सासवडचा कचरा सासवडमध्येच जिरवा

सासवडचा कचरा सासवडमध्येच जिरवा

Next

खळद : शहरांनी आपला कचरा आपल्याच हद्दीत छोटे-छोटे बायोगॅस व कंपोस्ट प्रकल्प उभारून जिरवावा, असे राज्य शासनाचे धोरण आहे. पुणे शहराच्या विविध भागांत असे ३५ प्रकल्प चालू आहेत. त्यासाठी अवघी ३ ते ५ गुंठे जागा लागते. सासवड नगरपालिकेनेही आहे त्या जागेत दुर्गंधीविरहित प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव द्यावा. त्याला मंजुरी व आवश्यक निधीची तरतूद राज्य शासन करेल, असे निर्देश नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी बुधवारी सासवड नगरपालिकेला दिले.
कुंभारवळण येथील सासवड नगरपालिकेच्या कचरा डेपोप्रश्नी पाटील व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. तीत हे निर्देश देण्यात आले.
बैैठकीत पुणे मनपाचे उपायुक्त सुरेश जगताप यांनी पुण्यात अवघ्या ३ ते ५ गुंठे जागेत उभारलेल्या बायोगॅस व कंपोस्ट प्रकल्पाच्या माहितीचे सादरीकरण केले. यानंतर राज्यमंत्री पाटील यांनी, सासवड नगरपालिकेला पुरंदर हायस्कूलसमोर कचरा डेपोसाठी राज्य सरकारने जवळपास साडेचार एकर जागा दिलेली होती. या जागेवर व्यावसायिक वापराचे आरक्षण टाकून कचरा प्रकल्प कुंभारवळणला हलवणे अन्यायकारक ठरेल. कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीची ना हरकत आवश्यक असते. नगरपालिकेने ती मिळवली नाहीच; शिवाय घालून दिलेले निकषही पूर्ण केलेले नसल्याने हा प्रकल्प रेटणे उचित ठरणार नाही. त्यामुळे नगरपालिकेने बायोगॅस व कंपोस्ट प्रकल्पासाठी मागणी करावी, सरकार त्याला व्हीजीएफ फंडातून निधीच्या तरतुदीसह मंजुरी देईल. हरित लवादाच्या सूचनांचा पूर्णपणे आदर राखून कुंभारवळण ग्रामस्थांवर अन्याय न करता हा मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असेही पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले.
राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, ‘‘आजच्या बैठकीत झालेला निर्णय हा सासवड व कुंभारवळण दोन्ही बाजूंसाठी योग्य आहे. सासवड नगरपालिकेने लवकरात लवकर प्रस्ताव सादर केल्यास हा प्रश्नच निकालात निघेल. शासन सर्व सहकार्य नगरपालिकेला करण्यास तयार आहे.’’
या बैठकीला नगरविकास विभागाचे अव्वल सचिव संजय सावजी, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार संजय पाटील, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, नगरसेवक राजेश दळवी, अभिजित जगताप, धीरज जगताप, अजित जगताप, पं. स. सदस्य दत्ता झुरंगे, रामभाऊ झुरंगे, देविदास कामठे, नारायण खळदकर, राजेंद्र टिळेकर, कुंभारवळणचे सरपंच अमोल कामठे, वनपुरीच्या सरपंच लक्ष्मी कुंभारकर, उदाचीवाडीच्या सरपंच सुनंदा झेंडे उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Insert sausages of sausage in saasavad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.