आरक्षणाची धाकधूक
By admin | Published: October 4, 2016 01:53 AM2016-10-04T01:53:18+5:302016-10-04T01:53:18+5:30
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या बहुचर्चित प्रभाग रचनेवरील पडदा येत्या शुक्रवारी (दि. ७) वर उठेल. त्या दिवशी सकाळी ११ वाजता गणेश कला
पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या बहुचर्चित प्रभाग रचनेवरील पडदा येत्या शुक्रवारी (दि. ७) वर उठेल. त्या दिवशी सकाळी ११ वाजता गणेश कला क्रीडा मंचात प्रभागांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्याचदिवशी प्रभागांचे नव्या रचनेचे नकाशे जाहीर करण्यात येणार असून, हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १० ते २५ नोव्हेंबर मुदत देण्यात आली आहे.
पालिकेचे निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. सहायक निवडणूक अधिकारी संजय मोरे या वेळी उपस्थित होते. प्रत्येकी ४ सदस्यांचे ३९ प्रभाग व प्रत्येकी ३ सदस्यांचे २ प्रभाग अशा एकूण ३९ प्रभागांचे नकाशे या वेळी जाहीर करण्यात येतील. महिलांना ५० टक्के आरक्षण असल्यामुळे एकूण १६२ सदस्यांमध्ये ८१ महिला असणार आहेत. प्रत्येक प्रभागातील एकूण चार सदस्यांपैकी २ सदस्य महिला असतील. तीन सदस्यांच्या प्रभागात असे करता येणार नसल्यामुळे तिथे त्यातील एका प्रभागात दोन महिला सदस्य असतील व दुसऱ्यात एकच महिला सदस्य असेल. याप्रमाणे त्या सहा सदस्यांपैकी ३ महिला व ३ पुरुष सदस्य असतील, असे कुलकर्णी यांनी सांगितले. सर्व राखीव जागांसाठीही महिलांचे आरक्षण ५० टक्के म्हणजे एकूण राखीव जागांच्या निम्मे असेल, असे ते म्हणाले.
आरक्षण सोडतीविषयी सविस्तर माहिती देताना कुलकर्णी म्हणाले, ‘‘प्रत्येक प्रभागातील त्या-त्या राखीव गटाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण निश्चित करून तसे प्रभाग उतरत्या क्रमानुसार ठरवून त्यावर आरक्षण सोडत काढण्यात येईल. अनुसूचित जातींसाठी त्यांच्या व एकूण लोकसंख्येच्या तुलनेत नियमानुसार एकूण २२ जागा राखीव येतात. ५० टक्के आरक्षणानुसार त्यातील ११ जागा त्या गटाच्या महिलांसाठी व उर्वरित ११ सर्वसाधारण असतील. अनुसूचित जमातीसाठी २ जागा राखीव असून, त्यातील १ महिलांसाठी व १ सर्वसाधारण असेल. नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) या गटासाठी एकूण ४४ जागा असून, त्यातील २२ महिलांसाठी व उर्वरित सर्वसाधारण असतील. सर्वसाधारण गटासाठीच्या एकूण जागा ९४ असून त्यातील ४७ महिलांसाठी असतील. ’’
आरक्षण निश्चित करताना प्रत्येक प्रभागात उपलब्ध असलेली पहिली जागा ही त्या-त्या प्रवर्गाकरिता आरक्षित होईल. उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक ५ व १७ हे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार अनुसूचित जातींसाठी राखीव होत असल्यास त्यातील जागा क्रमांक ५ अ व १७ अ अनुसूचित जातींकरिता राखीव होतील. याच पद्धतीने सर्व राखीव गटांची सोडत काढण्यात येईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.