न्यायालय इमारतीसाठी पाहणी
By admin | Published: January 11, 2017 03:20 AM2017-01-11T03:20:35+5:302017-01-11T03:20:35+5:30
पिंपरीतील दिवाणी व फौजदारी न्यायालयासाठी प्राधिकरणाने मोशी येथे जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेची पाहणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक
पिंपरी : पिंपरीतील दिवाणी व फौजदारी न्यायालयासाठी प्राधिकरणाने मोशी येथे जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेची पाहणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक व कर्णिक यांनी केली. पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
पिंपरी, मोरवाडीत महापालिकेच्या इमारतीत सध्या न्यायालयाला भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही जागा अपुरी पडते आहे. शिवाय वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालयाचीसुद्धा गरज निर्माण झाली आहे.
शासनस्तरावर पाठपुरावा केल्यानंतर प्राधिकरणाच्या माध्यमातून न्यायालयाला मोशी येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाची मंजुरीही मिळाली आहे. त्या ठिकाणी इमारत उभारणीचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने न्यायाधीशांनी जागेची पाहणी केली. जागेवर अतिक़्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना या वेळी त्यांनी दिल्या.
या वेळी पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष किरण पवार, सुहास पडवळ, संजय दातीर पाटील, राकेश अकोले, अतिश लांडगे, जिजाबा काळभोर, पी.एस. कांबळे, बी. के. कांबळे, विलास कुटे, सारिका परदेशी,सुनील कड आदी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)