धोकादायक बस थांब्यांची पाहणी, बीआरटीच्या नूतनीकरणाचे काम रखडलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 03:23 AM2019-01-06T03:23:54+5:302019-01-06T03:24:03+5:30
सातारा रस्त्यावरील स्वारगेट ते कात्रज या ६.२ किलोमीटर अंतरावर बीआरटी मार्गाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून अद्यापही पूर्ण झाले नाही.
धनकवडी : सातारा रस्ता बीआरटी मार्गाचे रखडलेले काम, धोकादायक बस थांबे यामुळे प्रवाशांचे होणारे हाल याबाबत माजी महापौर नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांनी हा मुद्दा उचलून धरला होता आणि ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी धोकादायक ठिकाणांची पाहणी केली.
सातारा रस्त्यावरील स्वारगेट ते कात्रज या ६.२ किलोमीटर अंतरावर बीआरटी मार्गाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून अद्यापही पूर्ण झाले नाही. काम होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत प्रशासनाने अनेक वेळा आश्वासने दिली होती. मात्र अजूनही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे धनकवडी - कात्रजमधील नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. प्रवाशांना रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून धोकादायक पद्धतीने बसमध्ये चढावे-उतरावे लागत होते. ‘लोकमत’ने याबाबत वाचा फोडली आणि या सर्व समस्यांची माहिती नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांनी पुण्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांना दिली. सदरील काम वेळेत पूर्ण झाले नाही व प्रवाशांच्या जीविताची काळजी घेतली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने प्रशासनाच्याविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. यावेळी नगरसेवक वसंत मोरे, नगरसेविका राणी भोसले, स्मिता कोंढरे, मानसी देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते नमेश बाबर उपस्थित होते.
नागरिकांना भेडसावणाºया अडचणी...
१ धनकवडी भागातील श्री सद्गुरू शंकरमहाराज परिसर, अहिल्यादेवी चौक, बालाजीनगर बस थांबा या ठिकाणी नागरिकांना भेडसावणाºया अडचणी, तसेच होणारी दुर्घटना या ठिकाणी अपघात होऊ शकतो, या बाबी अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
२ या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, बीआरटी रस्त्याचे सल्लागार व इतर मनपा अधिकाºयांनी बीआरटी मार्गावर काय अडचणी आहेत, याची प्रत्यक्ष पाहणी केली.
३ याबाबत अतिरिक्त आयुक्त निंबाळकर यांनी अधिकाºयांबरोबर लवकरात लवकर बैठक घेऊन निर्णय घेऊ व या परिसरातील नागरिकांना भेडसावणारे प्रश्न सोडवू, असे सांगितले.