पालिकेत समाविष्ट गावांमधील बेकायदा बांधकामांवर संक्रांत, उपग्रहाच्या साह्याने करणार पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 07:03 AM2017-10-07T07:03:02+5:302017-10-07T07:03:13+5:30
राज्य सरकारच्या अधिसूचनेद्वारे अखेर महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील बांधकामांवर महापालिका प्रशासन उपग्रहाच्या साह्याने नजर ठेवणार आहे.
पुणे : राज्य सरकारच्या अधिसूचनेद्वारे अखेर महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील बांधकामांवर महापालिका प्रशासन उपग्रहाच्या साह्याने नजर ठेवणार आहे. बेकायदा बांधकामांवर त्वरित कारवाई करण्यात येईल. यापुढे नियमानुसारच बांधकामांना परवानगी दिली जाईल. सर्व गावांचा संपूर्ण सर्व्हेही जीआयएस या यंत्रणेच्या साह्याने करून घेण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ही माहिती दिली. या गावांमधील सद्यस्थितीचा आढावा तसेच यापुढे काय करता येईल याची चर्चा करण्यासाठी आयुक्तांनी शुक्रवारी दुपारी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. त्यात अधिकाºयांनी महापालिकेत गावे समाविष्ट होणार याची खात्री असल्याने बेकायदेशीर बांधकामांचे या गावांमध्ये पेवच फुटले होते, त्याला आळा घालण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यासाठीच अत्याधुनिक यंत्रणेद्वारे गावांचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे आदेश अधिकाºयांना दिले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
समाविष्ट झालेल्या उरुळी देवाची, फुरसुंगी, लोहगाव, शिवणे, मुंढवा, साडेसतरा नळी, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक आणि शिवणे या गावांचा विस्तृत विकास आराखडाही तयार करण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले. नागरिकांच्याही महापालिकेकडून अपेक्षा असतील. प्रशासन या सर्व गावांमधील नागरिकांसमवेत बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेईल असे आयुक्त म्हणाले. रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा व शिक्षण या गोष्टींना प्राधान्य देउन पुढील सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल. गावांलगतच्या पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून या कामाचे नियोजन करण्यात येईल़