जिल्ह्यात ३ लाख ७५ हजार १३४ माती नुमन्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:11 AM2021-03-17T04:11:50+5:302021-03-17T04:11:50+5:30
रवीकिरण सासवडे लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : जमिनीचे प्रदूषण थांबावे, जमिनीमध्ये सेंद्रिय खतांच्या माध्यमातून सुपीकता वाढावी, रासायनिक ...
रवीकिरण सासवडे
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : जमिनीचे प्रदूषण थांबावे, जमिनीमध्ये सेंद्रिय खतांच्या माध्यमातून सुपीकता वाढावी, रासायनिक खतांचा अनावश्यक वापर कमी व्हावा, यासाठी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांर्गत यासाठी जिल्ह्यातील ३ लाख ७५ हजार १३४ माती नमुने तपासण्यात आले. यामधून १२ लाख २६ हजार ५२३ जमिनीच्या आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. जमिनीच्या आरोग्य पत्रिकेच्या गावनिहाय माहितीच्या आधारे जमिनीचा हा सुपीकता निर्देशांक तयार करण्यात आला आहे. तपासणी झालेल्या गावांमध्ये सुपीकता निर्देशांक फलाकाचे आनावरण केल्यामुळे सबंधीत गावातील शेतकऱ्यांना देखील आपल्या गावातील शेतीमध्ये असणारी नैसर्गित मूलद्रव्यांची माहिती होईल, परिणामी अनावश्यक खतांचा वापर कमी होण्यास मदत होणार आहे.
या अभियानातंर्गत पुणे जिल्ह्याचा सुपीकता निर्देशांक मध्यम स्वरूपाचा अढळून आला आहे. पुणे जिल्ह्यातील मातीमध्ये नत्र-१.३३, स्फुरद-१.५८ तर पालाशचे प्रमाण १.९८ एवढ्याप्रमाणात अढळून आले आहे. सध्या जिल्ह्यातील ज्या गावांची तपासणी झाली आहे अशा गावांमध्ये सुपीकता निर्देशांक फलक लावण्याचे काम कृषि विभागाच्या वतीने सुरू आहे. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमिनीच्या आरोग्य पत्रिका तयार करण्यात येतात. जिल्ह्यामध्ये २०१५-१६ पासून या अभियानाला सुरुवात झाली. या अभियानार्तंगत मातीतील १२ घटक तपासून शेतकऱ्यांना खत वापराच्या शिफारशी दिल्या जातात. जिल्ह्यामध्ये सन २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये पहिल्या टप्प्यात १ हजार ८१३ गावांमध्ये १ लाख ७१ हजार ८०२ माती नमुने तपासण्यात आले. यामध्ये ४ लाख ६१ हजार ५३६ जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. सन २०१७-१८ व २०१८-१९ या दुसऱ्या टप्प्यात १ हजार ८७८ गावांमध्ये १ लाख ९१ हजार ३९० माती नमुने तपासण्यात आले. यामध्ये ७ लाख ५३ हजार ८० जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. २०१९-२० या वर्षात पथदर्शी प्रकल्पातंर्गत १३ गावांमध्ये ११ हजार ९४२ नमुमे तपासण्यात आले. ११ हजार ९४२ जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. या गावांमध्ये ६०१ हेक्टर क्षेत्रावर मृदा चाचणीवर आधारीत प्रत्यक्षिके व ५२ शेतकरी प्रशिक्षणवर्ग घेण्यात आले. या अंतर्गत आज अखेर जिल्ह्यात एकूण १८०८ गावांपैकी ७९३ गावामध्ये जमीन सुपीकता निदेर्शांक फलकांचे अनावरण झाले आहे. सुपीकता निर्देशांक फलक आनावरणामध्ये पुणे विभागामध्ये पुणे जिल्हा अग्रेसर आहे. सूक्ष्म मूलद्रव्यांची कमतरता समजून येते.तसेच गावातील मुख्य पिकांसाठी संबंधित कृषी विद्यापीठांचे खत शिफारशीद्वारे रासायनिक खतांच्या संतुलित मात्रा देता येतात.सदरचा फलक गावामध्ये केवळ प्रदर्शित न करता त्याचे सामूहिक वाचन करण्यासाठी गावातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये जमीन आरोग्य पत्रिकेचे महत्व,रासायनिक खतांचा कमीतकमी व संतुलित वापर, सेंद्रिय खतांचा वापर, रासायनिक खतांचे मानवी शरीरावर होणारे परिणाम आदी बाबींची माहिती सबंधीत गावातील शेतकऱ्यांना व्हावी असा यामागील उद्देश आहे. सूक्ष्म मूलद्रव्ये कमतरतेनुसार खताची शिफारस राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम २०२०-२१ जिल्ह्यातील प्रति तालुका १० गावांची निवड करण्यात येत आहे.
चाैकट
शेतकऱ्यांकडून युरिया या रासायनिक खताचा सर्रास मोठ्याप्रमाणावर वापर केला जातो. वास्तविक पाहता शेतजमिनीतील मातीच्या नमुन्याची ठराविक कालावधीने तपासणी करून जमीन आरोग्यपत्रिका पत्रिका प्राप्त करणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या मुूलद्रव्यांची कमतरता आहे ते समजून त्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करता येणे शक्य आहे. नत्र खतासाठी युरियाचा वापर कमी करण्यासाठी सेंद्रिय खते, हिरवळीची खते आदींचा वापर करण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. यरिया हे विद्राव्य खत असल्याने ते पाण्यात विरघळून वाहून जाते. त्यामुळे त्याच अनावश्यक वापर टाळणे तितकेच महत्वाते आहे. नत्र खतासाठी युरियाचा एकदाच वापर करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने वापर (स्प्लीट पद्धत) होण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोट
जमिनीची सुपीकता वाढावी, टिकावी यासाठी अनावश्यक रासायनिक नत्र खतांचा वापर कमी करायला हवा. यासाठी आपल्या शेतामध्ये कोणत्या मूलद्रव्यांची उपलब्धता आहे. हे शेतकऱ्यांना माहिती व्हावे यासाठी गावामध्ये सुपीकता निर्देशांक फलक लावण्यात येत आहे. या फलकाचे वाचण केल्यानंतर शेतकऱ्यांना जमिनीतील मूलद्रव्यांची माहिती होईल. तसेच अनावश्यक खतांवरील त्यांचा खर्च कमी होईल.
- ज्ञानेश्वर बोथे
जिल्हा कृषी अधीक्षक, पुणे जिल्हा
सुपीकता निर्देशांक फलक लावलेली गावे
तालुका माती तपासणी फलक टक्केवारी
झालेली गावे लावलेली गावे
हवेली ११५ ५१ ४४
वेल्हा ११९ ९१ ७६
भोर १९८ ११५ ५८
मावळ १७४ १३४ ७७
मुळशी १३२ २२ १७
खेड १८४ १८४ १००
जुन्नर १८३ १७० ९३
आंबेगाव १४२ १४० ९९
शिरूर ११० ११० १००
बारामती ११९ ११९ १००
इंदापूर १३९ ९८ ७१
दौैंड ९७ २० २१
पुरंदर ९६ ९६ १००
-------------------------------