जिल्ह्यात १५ दिवसांत ७१ हजार लोकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:09 AM2021-04-15T04:09:50+5:302021-04-15T04:09:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करण्यात येत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेने १८ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान ग्रामीण भागात जवळपास ७१ हजार ४५४ व्यक्तींची तपासणी केली. या तपासणी केलेल्या लोकांमध्ये पंधरा हजारांना कोरोनाची लक्षणे असलेल्या आढळून आले.
यात १ हजार ३७२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तपासणीच्या तुलनेत बाधित रुग्णांचे प्रमाण कमी असले तरी या व्यक्ती संसर्ग वाढवू शकतात म्हणून त्यांची चाचणी केल्याने प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.
याशिवाय जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुपर स्प्रेडरच्या सर्वेक्षणावर अधिक भर दिला आहे. मागील वीस दिवसाच्या सर्वेक्षणात १ हजार ३७२ कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यात दहा दिवसांतील ९०६ बाधितांचा समावेश आहे. सुपर स्प्रेडरच्या शोध मोहिमेमुळे कोरणा संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहे. ग्रामीण क्षेत्रातील किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, व्यापारी, म्हणजे ज्या व्यक्तींचा अनेक व्यक्तींबरोबर संपर्क येतो, अशी व्यक्ती ‘सुपर स्प्रेडर’ ठरते. त्यामुळे प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याची भीती अधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाने या सुपर स्प्रेडर सर्वेक्षणाला सुरवात केली. अंगणवाडी सेविका आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हाभर अशा व्यक्तींचे सर्वेक्षण सुरू केले आहे.