रासायनिक पाण्याच्या स्त्रोतांची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:09 AM2021-05-22T04:09:44+5:302021-05-22T04:09:44+5:30

कुरकुंभ : पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातून सोडण्यात आलेल्या रासायनिक दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. ...

Inspection of chemical water sources | रासायनिक पाण्याच्या स्त्रोतांची केली पाहणी

रासायनिक पाण्याच्या स्त्रोतांची केली पाहणी

Next

कुरकुंभ : पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातून सोडण्यात आलेल्या रासायनिक दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. अखेर तहसीलदारांना या दूषित पाण्याच्या स्त्राेतांची पाहणी करण्याचा मुहूर्त मिळाला. शुक्रवारी तहसीलदार संजय पाटील यांनी पाहणी करून प्रदूषण मंडळ, औद्योगिक विकास महामंडळ व सामूहिक सांडपाणी प्रशासन यांच्यासोबत बैठक घेतली. दरम्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या पाण्याच्या गळतीला त्वरित थांबवण्याची ग्वाही दिली आहे

गेली अनेक वर्षे औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्या, प्रदूषण मंडळ व सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांच्या आश्वासनाला व भूलथापांना बळी न पडता परिसरातील शेतकऱ्यांनी थेट त्यांच्या शेतात येणाऱ्या पाण्याला मुरुमाच्या साहाय्याने बुजवून दूषित पाणी अडवले. त्यामुळे एरवी ओढ्या, नाल्यातून वाहणाऱ्या रासायनिक दूषित पाण्याची वाट बंद झाल्याने पाणी थेट पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर जमा झाले. परिणामी वाहतुकीला येणाऱ्या अडचणी व रस्त्यावर जमा झालेल्या रासायनिक दूषित पाण्याने शेवटी प्रशासनाला जागे करून सोडले. याबाबत अनेक दिवसांपासून लेखी व तोंडी तक्रारी करून देखील काहीच कारवाई होत नसल्याचे दिसून आल्यावर ग्रामप्रशासनाला स्वतःहून पुढे येऊन ज्या कंपन्या रासायनिक दूषित पाणी सोडत आहेत, अशा कंपन्यांच्या पाण्याच्या चाऱ्या बंद कराव्या लागल्या. या कारवाईमुळे निर्माण झालेल्या कायदा व सुव्यस्थेच्या समस्येने प्रशासनाला ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत प्रत्यक्ष पाहणी व बैठक घ्यावी लागली. या वेळी तहसीलदार संजय पाटील, प्रदूषण मंडळाचे विभागीय अधिकारी नितीन शिंदे, औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता विजय पेटकर, पोलीस निरीक्षक नारायण पवार, सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे अधिकारी नरसिंग थोरात, सरपंच राहुल भोसले, माजी उपसरपंच सुनील पवार, आयुब शेख, शेतकरी रोहित कुलंगे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या पाण्याच्या गळतीला त्वरित थांबवण्याची ग्वाही दिली आहे. तर प्रदूषण मंडळानेदेखील दूषित पाणी सोडणाऱ्या कंपनी मालकांवर त्वरित कारवाईचे आश्वासन दिले आहे. सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने हे पाणी त्वरित उचलून घेणे सुरू केले असून, यावर पुढील पंधरा ते वीस दिवसांत तोडगा काढून पुन्हा बैठक घेण्याबाबत निर्देश तहसीलदारांनी तत्सम विभागांना दिले आहेत.

कोरोनाच्या महामारीत अनेक औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना परवानगी देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांच्या आडून बऱ्याच अन्य कंपनी व्यवस्थापनाने दूषित रासायनिक पाणी राजरोसपणे उघड्यावर सोडण्याचा सपाट लावला आहे. परिणामी दिवसेंदिवस प्रदूषणाच्या समस्या वाढत जाऊन शेवटी ग्रामस्थांच्या घराजवळ पोहचल्या आहेत. याबाबत त्वरित काही कंपन्यांवर कारवाई करीत अन्य कंपन्यांचा शोध पुढील पंधरा दिवसांत घेणार असल्याची माहिती प्रदूषण मंडळाचे अधिकारी नितीन शिंदे यांनी दिली आहे.

२१ कुरकुंभ

पुणे-सोलापूर महामार्गावर आलेल्या रासायनिक दूषित पाण्याची प्रत्यक्ष पाहणी करताना प्रशासकीय अधिकारी.

Web Title: Inspection of chemical water sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.