पोलीस आयुक्तांनी केली पालखी मार्गांची पाहणी
By admin | Published: June 18, 2017 09:25 PM2017-06-18T21:25:16+5:302017-06-18T21:25:16+5:30
पुण्यनगरीमध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 18 - पुण्यनगरीमध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. शहराच्या मध्यवर्ती भागासह पालखी मार्गावर जागोजाग वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी स्वत: सर्वत्र पायी फिरुन प्रमुख पालखी मार्गावरील बंदोबस्तासह सुरक्षेचा आढावा घेतला.
शुक्ला यांच्यासह सह पोलीस आयुक्त रविंद्र कदम, अतिरीक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रदीप देशपांडे, उपायुक्त डॉ. बसवराज तेली, वाहतूक उपायुक्त अशोक मोराळे, व्ही. बी. गायकर, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सुरेश भोसले, वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील, क्रांती पवार, बी. जी. मिसाळ आदी अधिकारी उपस्थित होते. फर्गसन महाविद्यालय रस्ता, पाटील इस्टेट ते संगमवाडी, वाकडेवाडी, पालखीची विसावा स्थाने, पालखी मुक्काम स्थानांची आयुक्तांनी पाहणी केली. संगमवाडी येथे शुक्ला यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. बंदोबस्तातील पोलिसांना सतर्कतेच्या आणि जागरुक राहण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. वारकरी आणि भाविकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्याच्याही सुचना त्यांनी केल्या.
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुणे शहरात आल्या आहेत. पालख्यांसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये पोलिसांनी सर्वांना सौजन्याची वागणूक द्यावी, कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत हा आमचा सर्वतोपरी प्रयत्न आहे. दोन्ही संत आणि वारकरी बांधव आमच्यासाठी श्रध्दास्थानी आहेत. शहरातील पालखी सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
- रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त