वैकुंठ स्मशानभूमीची "निरी"च्या पथकाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:09 AM2021-07-22T04:09:04+5:302021-07-22T04:09:04+5:30
पुणे : शहरातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढल्याने वैकुंठ स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्यात आली होती. येथील ...
पुणे : शहरातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढल्याने वैकुंठ स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्यात आली होती. येथील अंत्यविधी वाढल्याने धुराचे प्रमाणही वाढले होते. वैकुंठ स्मशानभूमीच्या प्रदूषणाबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील आक्षेप घेत निरीकडून तपासणी करून घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाची धावपळ उडाली होती. यासंदर्भात पालिकेने निरीसोबत पत्रव्यवहार केला होता. मंगळवारी निरीच्या पथकाने स्मशानभूमीची पाहणी केली. आणखी तीन दिवस ही तपासणी सुरू राहणार आहे.
या पथकात निरीच्या पद्मा राव, शर्मा यांचा समावेश असून त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रताप जगताप हे देखील उपस्थित होते. वैकुंठ स्मशानभूमीतील प्रदूषणाबाबत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती. विद्युत दाहिनीच्या चिमणीची रूंदी कमी असून धूरासोबत बाहेर पडणारी राख थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. तसेच स्थानिक नागरिक हरित न्यायाधिकरणात गेले आहेत.
त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी केली होती. धूर कमी करण्यासाठी निरीच्या माध्यमातून यंत्रणेची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार निरीच्या पथकाने मंगळवारी पाहणी करून काही निरीक्षणे नोंदविली आहेत. त्यांनी सुचविलेल्या निकषांनुसार बदल केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
----
वैकुंठ स्मशानभूमीमधील वृक्षराजी आणि हिरवळीबाबत निरीच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच यंत्रसामुग्री चांगली असल्याचे नमूद केले. मात्र, त्याच्या कार्यप्रणालीमध्ये दोष असल्याचे नमूद केले आहे. येथील विविध वायू (गॅस) आणि रसायनाची (केमिकल) तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम अहवाल दिला जाणार आहे. दरम्यान, स्मशानभूमीत लाकडावर होणारे अंत्यविधी कमी करण्याची प्राथमिक शिफारस निरीच्या सदस्यांनी केल्याचे विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले.