वाहतूक शाखेच्या निरीक्षकानं इंटेरिअर डेकोरेटरच्या कानाला लावलं पिस्तूल;पुण्यातील खळबळजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 08:25 PM2021-07-27T20:25:03+5:302021-07-27T20:26:53+5:30
समर्थ वाहतूक शाखेतील धक्कादायक प्रकार : केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
पुणे : घराचे इंटेरिअर डेकोरेशनचे काम व्यवस्थित झाले नाही, म्हणत वाहतूक शाखेच्या एका पोलीस निरीक्षकाने इंटेरियर डेकोरेटरच्या कानाखाली पिस्तुल लावून दिलेले पैसे परत मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकाराने संपूर्ण पुणे पालीस दलात खळबळ उडाली आहे.
राजेश पुराणिक असे वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. पुराणिक हे समर्थ वाहतूक विभागात निरीक्षक आहेत.
याप्रकरणी कार्तिक रामनिवास ओझा यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात त्यांनी राजेश पुराणिक यांनी कानाखाली पिस्तुल लावून मारहाण केली. तसेच कुटुंबियांचाही मानसिक छळ केल्याचे म्हटले आहे.
पुराणिक हे राहत असलेल्या नाना पेठेतील घराचे इंटेरिअर डेकोरेशनचे काम करण्यास ओझा यांना दिले होते. घराचे ७० टक्के काम पूर्ण झाल्यावर पुराणिक यांच्याकडे ओझा यांनी कामगारांचे पैसे देण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यावेळी पुराणिक यांनी कामामध्ये किरकोळ चुका काढल्या. तसेच काम व्यवस्थित झाले नसल्याचे म्हणत पैसे देण्यास नकार देत कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली. ते गेल्या ८ दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारे धमक्या देत व पैशांची मागणी करीत आहेत. ते कुटुंबातील सदस्यांना मानसिक त्रास देत आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.
पुराणिक यांनी ओझा यांना समर्थ वाहतूक विभागात सर्व कागदपत्रे घेऊन बोलावले. त्या ठिकाणी पैसे दिले नाहीत म्हणून बुटाने व लाथाबुक्क्यांनी बेदाम मारहाण केली. त्यानंतर कानाखाली पिस्तुल लावून दम देत कागदपत्रांवर सही घेतली. जबरदस्तीने मोबाईल घेऊन त्यातील संपर्कातील व्यक्तींना चुकीचे संदेश पाठविले. असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी कार्तिक ओझा यांच्या बहिणीने पोलीस आयुक्तालयात तक्रार अर्ज दिला होता. तसेच समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जावरुन पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणी पिस्तुलाचा धाक दाखविला असेल तर त्याच्यावर कलम ३०७ नुसार खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दखल केला जातो.
याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांनी सांगितले की, समर्थ पोलीस ठाण्यात प्राप्त झालेल्या तक्रार अर्जानुसार आता अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जात हत्यार लावल्याचे म्हटले आहे. त्याबाबत चौकशी करुन पुढील कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना कळविण्यात आले आहे.
राजेश पुराणिक हे एक कर्तव्यनिष्ठ व कायद्याबाबत अतिशय कठोर असलेले अधिकारी म्हणून ओळखले जातात. पुराणिक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, या प्रकारामुळे त्यांनी मोबाईल कॉल न घेतल्याने संपर्क होऊ शकला नाही.