सराईत गुंडांच्या गुन्ह्यांची जबाबदारी निरीक्षकाची
By admin | Published: May 5, 2015 03:14 AM2015-05-05T03:14:11+5:302015-05-05T03:14:11+5:30
खुनाच्या तीन घटना रविवारी रात्री घडल्या आहेत. यातील एका खुनात सराईताचा हात असल्याचे तपासात पुढे आले आहे. याचा अर्थ स्थानिक पोलीस ठाण्यांच्या
पुणे : खुनाच्या तीन घटना रविवारी रात्री घडल्या आहेत. यातील एका खुनात सराईताचा हात असल्याचे तपासात पुढे आले आहे. याचा अर्थ स्थानिक पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांचा सराईतांवर अंकुश राहिलेला नाही. यापुढे पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईताने गुन्हा केल्यास त्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी दिली.
रविवारी रात्री झालेल्या खुनाची वेगवेगळी कारणे आहेत. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांचे आणि सराईतांचे रेकॉर्ड आपण स्वत: तपासत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर जर कारवाई होत नसेल तर माझ्या स्तरावर कारवाई करीन. गुन्हेगार मोकाट असणे हे पोलीस ठाण्यांचे अपयश आहे. त्याला स्थानिक अधिकारीच दोषी आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी यापुढे विशेष उपाययोजना करण्यात येतील.
सर्वसामान्यांना ज्या दैनंदिन तक्रारींचा सामना करावा लागतो त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. रस्त्यांवर घडणारे गुन्हे अर्थात स्ट्रीट क्राईम कमी करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. त्यासाठी प्रयत्न सुरू
आहेत. मुंबईमध्ये वाकोला पोलीस ठाण्यात घडलेली घटना दुर्दैवी असून, पोलिसांचे कामाचे तास कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले आहेत. सध्याही सुरू आहेत. परंतु मनुष्यबळाचाच प्रश्न महत्त्वाचा असल्याचे आयुक्त पाठक म्हणाले.