राष्ट्र उभारणीची प्रेरणा संस्कृतीतूनच मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:13 AM2021-08-26T04:13:46+5:302021-08-26T04:13:46+5:30

पुणे : “भारताची ओळख ही केवळ येथील वंश, भाषा व जाती यांवर आधारित नसून ती एकात्म संस्कृतीतून निर्माण झाली ...

The inspiration for nation building comes from culture | राष्ट्र उभारणीची प्रेरणा संस्कृतीतूनच मिळते

राष्ट्र उभारणीची प्रेरणा संस्कृतीतूनच मिळते

googlenewsNext

पुणे : “भारताची ओळख ही केवळ येथील वंश, भाषा व जाती यांवर आधारित नसून ती एकात्म संस्कृतीतून निर्माण झाली आहे. राष्ट्राच्या उभारणीची प्रेरणा ही त्याच्या संस्कृतीतूनच मिळते. ती परदेशातून आयात करून चालत नाही,” असे मत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ‘भारतीय एकतेची मूलभूत तत्त्वे’ या विषयावर आरिफ मोहम्मद खान बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश कुलकर्णी, प्रा. शांतीश्री पंडित, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई आदी या वेळी उपस्थित होते.

आरिफ मोहम्मद खान म्हणाले की, भारतीय संस्कृती सर्व प्राणिमात्रांना समान प्रतिष्ठा देते. या संस्कृतीची मुळे वेद व उपनिषदांमध्ये आहेत. नवीन पिढीने हा सांस्कृतिक ठेवा वृद्धिंगत केला पाहिजे. दीर्घकाळ ज्या राष्ट्राला नाकारले गेले, ज्यावर परकीय राज्य करत होते, त्या राष्ट्राच्या उत्थान्नाची प्रेरणा ही परदेशी विचारांनी प्रभावित असू शकत नाही. भारतासाठीसुद्धा हा प्रेरणास्रोत इथल्या संस्कृती आणि परंपरांच्या मुळाशी दडलेला आहे. डॉ. नितीन करमळकर म्हणाले, “भारतीय प्रबोधनात आणि शैक्षणिक क्षेत्रात पुण्याचे मौलिक योगदान आहे. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, नामदार गोखले यांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तींचा पुण्याला वारसा असून तोच विद्यापीठ पुढे चालवत आहे.”

चौकट

“जगातील इतर देशांप्रमाणे भाषा, राहणीमान, उपासना पद्धत, प्रांत किंवा वर्णाच्या आधारे भारतीय सभ्यतेच्या बाबतीत मापदंड लावता येणार नाही. कारण, भारतात वेगवेगळ्या उपासना पद्धती, भाषा, राहणीमान, वर्ण सर्वच काही आहे. एका मापदंडात इथली सभ्यतेची परिभाषा करता येणार नाही.”

-आरिफ मोहम्मद खान, राज्यपाल, केरळ

Web Title: The inspiration for nation building comes from culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.