प्रेम हवं तर असं : शहीद मेजर नायर यांची हृदयस्पर्शी लव्ह स्टोरी !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 05:37 PM2019-02-14T17:37:01+5:302019-02-14T17:39:58+5:30
खऱ्या प्रेमाला ना वयाचे बंधन, ना जात,पात, धर्माची भीती. असतात फक्त एकमेकांशी जुळलेले प्रेमाचे धागे. ही कहाणी आहे शहीद मेजर शशिधरन नायर यांची. वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी मातृभूमीच्या रक्षणात धारातीर्थी पडलेल्या या रियल हिरोची प्रेम कहाणीही कायम लक्षात राहणारी आहे.
पुणे : खऱ्या प्रेमाला ना वयाचे बंधन, ना जात,पात, धर्माची भीती. असतात फक्त एकमेकांशी जुळलेले प्रेमाचे धागे. ही कहाणी आहे शहीद मेजर शशिधरन नायर यांची. वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी मातृभूमीच्या रक्षणात धारातीर्थी पडलेल्या या रियल हिरोची प्रेम कहाणीही कायम लक्षात राहणारी आहे.
अगदी लहानपणापासून सैन्यात जाण्याच्या वेडाने पछाडलेल्या शशीला कधी प्रेम करायला वेळचं नव्हता. शिक्षण संपल्यावर आणि सैन्यात रुजू झाल्यावर एका मित्राच्या घरी त्याची तृप्ती यांच्याशी पहिली भेट झाली. २७ वर्षाचा हा उमदा आणि काहीशा अबोल कॅप्टन पाहताच क्षणी आपल्या प्रेमात पडल्याची जाणीवही त्यांना नव्ह्ती. अखेर मित्रांनी मध्यस्थी केली सहा महिन्यात त्यांचा साखरपुडासुद्धा झाला. लग्न आणि साखरपुड्याच्या दरम्यान असणारे गोड क्षण पूर्ण अनुभवलेही नव्हते पण त्याआधीच तृप्ती यांना एका आजाराने घेरले. या आजारामुळे त्यांच्या हालचाली कमी व्हायला लागल्या. पण यावरही थांबेल ती नियती कसली ? तिला तरीही त्यांच्या नशिबाची परीक्षा बघायची होतीच. दुसरीकडे मित्रमंडळी शशी यांना लग्न मोडण्याचा सल्ला देत होते. पण तृप्ती यांच्या प्रति असलेलं त्यांचं प्रेम तसूभरही कमी झालं नव्हतं. अखेर त्यांनी लग्न केले पण संकटं पाठ सोडत नव्हती. लग्नानंतर काहीच महिन्यांनी तृप्ती यांचा पुन्हा वाढला आणि दुर्दैवाने त्यात त्यांचा कमरेखालचा भाग काम करेनासा झाला. त्यांना व्हीलचेअर शिवाय वावरणे कठीण झाले. अगदी शशी यांच्या अंत्यदर्शनासाठीही त्या व्हीलचेअरवर होत्या.
पण तरीही हे जोडपं आहे त्या परिस्थितीत आयुष्याचा आनंद घेत होते, सहजीवन अनुभव होते. त्यांचे सोशल मीडियावर दिसणारे फोटो त्यांच्या डोळ्यातला आनंद प्रतीत करणारे आहेत. आज 'व्हॅलेंटाईन डे'. मेजर शहीद होऊन अजून महिनाही पूर्ण झालेला नाही. पण त्यांच्या शौर्याच्या आणि प्रेमाच्या आठवणी येणाऱ्या पिढीला कायमच बळ देणाऱ्या ठरणार आहेत. भारतमातेचा पुत्र म्हणून तर त्यांना सलाम आहेच पण जोडीदार, सच्चा प्रेमी म्हणून त्यांनी घातलेल्या आदर्शामुळे आदर वाढला आहे.