नारायणगावात ७००० घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:12 AM2021-09-11T04:12:24+5:302021-09-11T04:12:24+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी गणेशभक्तांमध्ये गणरायाच्या आगमनादरम्यान उत्साह दिसून आला. दोन दिवसांपासून नारायणगाव शहरात गणपती प्रतिष्ठापना व देखाव्यासाठी डेकोरेशन ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी गणेशभक्तांमध्ये गणरायाच्या आगमनादरम्यान उत्साह दिसून आला. दोन दिवसांपासून नारायणगाव शहरात गणपती प्रतिष्ठापना व देखाव्यासाठी डेकोरेशन साहित्य व विविध पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी मुख्य बाजारपेठेत गर्दी झाली होती. यंदाच्या वर्षी नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या १९५ मंडळांपैकी १६५ छोट्या-मोठ्या मंडळांनी व सुमारे ७ हजार घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना स्थापना केली आहे. काही मंडळांनी यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती न बसविण्याचा निर्णय घेतला आहे. नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, पृथ्वीराज ताटे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती मंडळांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाचे नियम पाळून गणपतीची स्थापना करीत सामाजिक ऐक्याचे दर्शन दिले आहे.
यंदा कोरोना नियमांचे पालन करून आरोग्यविषयक कार्यक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांना पोलीस विभागाकडून उत्कृष्ट मंडळाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांनी दिली आहे.
यंदाच्या वर्षी नारायणगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तीच्या विक्रीमध्ये मागील वर्षीपेक्षा दुपटीने वाढ झाली आहे. यंदा नारायणगाव व वारूळवाडी परिसरात ३८ गणपती विक्रीचे स्टॉल होते. गणेश भाविकांनी यंदा पर्यावरणपूरक शाडूच्या व पीओपीच्या गणपतींची निवड केली. यामध्ये लालबागचा राजा, टिटवाळा गणपती, श्रीमंत दगडूशेठ गणपती या मूर्तींना तसेच डायमंडने सजावट केलेल्या व विविध पेहराव केलेल्या गणेशमूर्तींची मागणी जास्त होती. कोरोनामुळे काही विक्रेत्यांच्या गणेशमूर्ती १५ ते २० टक्के शिल्लक राहिल्या आहेत, अशी माहिती गणेशमूर्ती विक्रेते संतोष पाटे व किशोर मेहेर यांनी दिली आहे.
वारूळवाडी येथील श्री सिद्धिविनायक फेज - १ गणेश मंडळाने श्रद्धापूर्वक श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली.