दूध पुरवठा न करणाऱ्या संस्थांना मतदानाचा अधिकार नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:12 AM2021-09-24T04:12:32+5:302021-09-24T04:12:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघाची निवडणूक कधीही लागू शकते. यामुळेच या संघाला (कात्रज ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघाची निवडणूक कधीही लागू शकते. यामुळेच या संघाला (कात्रज डेअरीला) ज्या संस्था दूध पुरवठा करत नाहीत अशा अक्रियाशील संस्थांना संघाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देऊ नये. त्यासाठी संघाने न्यायालयात जाऊन दाद मागावी, असा ठरावच गुरुवारी झालेल्या संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
कात्रज दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष विष्णू हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्षा वैशाली गोपाळघरे, जेष्ठ संचालक गोपाळराव म्हस्के, गंगाधर जगदाळे, बाळासाहेब खिलारी, केशर पवार, कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर उपस्थित होते. संघाच्या ६४४ संस्था प्रतिनिधींनी सभेत सहभाग घेतला.
दूध संघाला नियमित दूध पुरवठा करणाऱ्या ५३३ क्रियाशील संस्था असून या संस्थांनाच फक्त मतदानाचा अधिकार द्यावा. तर १०५ संस्था ज्या मोडीत निघाल्या असून, १९९० पासून संघाला दूध पुरवठा करत नाहीत, अशा संस्थांचे पुनरुज्जीवन करून त्यांना सभासदत्व देऊन मताधिकार देण्यासंदर्भातील कारवाई सुरू आहे. या प्रक्रियेवर दूध उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणत्याही स्थितीत अक्रियाशील आणि पुनर्जीवित केलेल्या सुमारे २८६ संस्थांना मताधिकार देऊ नये. गरज वाटल्यास संघाने न्यायालयात दाद मागावी, असा ठराव सर्वानुमते करण्यात आला.
-------
कोरोना काळात २ कोटी ५० लाखांचा निव्वळ नफा
गेल्या आर्थिक वर्षामध्ये कोरोना महामारी आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही कात्रज दूध संघाला २ कोटी ५० लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. संघाचा स्वतंत्र पशुखाद्य कारखाना उभारण्यात येणार असून, येत्या दसऱ्यापर्यंत तो सुरू होईल. कात्रजच्या दूध उत्पादने आणि मिठाईला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
- विष्णू हिंगे, अध्यक्ष कात्रज दूध संघ
---------
शेतकऱ्यांना प्रति लीटर एक रुपया बोनस
गेल्या आर्थिक वर्षामध्ये कात्रज दूध संघाला दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घातलेल्या दुधावर प्रति लीटर एक रुपया याप्रमाणे बोनस देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. बोनसपोटी शेतकऱ्यांना ७ कोटी ९० लाख रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच दूध संस्थांनादेखील १५ टक्के लाभांश म्हणून १ कोटी चार लाख रुपयांची रक्कम देण्याची घोषणा बैठकीत करण्यात आली.