गणपती पाहण्यासाठी आलेल्या महिला भक्तांपुढे अपुऱ्या स्वच्छतागृहांचे विघ्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 01:20 PM2019-09-07T13:20:25+5:302019-09-07T13:40:16+5:30
गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी हजारो महिला रात्री उशिराप्रयत्न मुला-बाळांसह शहरामध्ये फिरत असतात.
पुणे : शहराच्या मध्यवस्तीत महिलांना सार्वजनिक स्वच्छतागृहांचा शोध घ्यावा लागतो. उपलब्ध स्वच्छतागृहांमध्ये प्रचंड अस्वच्छता... जरा बरी स्वच्छता असलेल्या ठिकाणी पाच-दहा रुपये द्यावे लागतात... स्वच्छगृहामध्येच ठेकेदारांच्या माणसांनी ठिय्या मांडल्याने महिलांना दारातूनच परत फिरावे लागते.. मोबाईल टॉयलेट कुठेही दिसत नाहीत... अशी परिस्थिती आहे. तब्बल ६ हजार कोटींचे बजेट असलेल्या पालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची.
पुण्याच्या गणेशोत्सवानिमित्त देश-विदेशातील नागरिक मोठ्या प्रमाणात शहरामध्ये येतात. यामध्ये गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी हजारो महिला रात्री उशिराप्रयत्न मुला-बाळांसह शहरामध्ये फिरत असतात. यामुळे या काळामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची मागणी वाढते. याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या वतीने मध्यवस्तीमध्ये पाहणी केली. कसबा गणपती ते दगडूशेठ गणपती, तुळशीबाग, मंडई गणपती, गुरुजी तालीम परिसरामध्ये महिलांसाठी तीन ते चारच सार्वजनिक स्वच्छतागृहे आढळून आली. महिला स्वच्छतागृहांमध्ये प्रचंड अस्वच्छता आढळून आली. प्रचंड दुर्गंधी, हात धुण्यासाठी वॉश बेसिन नाहीत की महिलांना पर्स, पिशवी अडकून ठेवण्यासाठी काही सुविधा ही नसल्याचे निदर्शनास आले. बहुतेक सर्व व्यवस्थापनासाठी पुरुषांची नियुक्ती केल्याचे निदर्शनास आले.
मंडई परिसरामध्ये महिलांसाठी दोन सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. यामध्ये महापालिकेच्या मिसाळ पार्किंगलगत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. महिलांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन वाटेल तसेच पैसे घेतले जात होते. याबाबत संबंधित कामगाराला विचारले असता अनेक वर्षांपासून आम्ही पैसे घेत असून, आम्हाला ही स्वच्छतागृह चालविण्यासाठी दिले असल्याचे सांगितले. परंतु, काही शाळकरी मुलींकडे पैसे नसल्याने पुन्हा मागे फिरण्याची वेळ आली. पालखी, गणेशोत्सवामध्ये स्वच्छतागृहांची मागणी वाढत असल्याने प्रमुख रस्त्यांवर जगोजागी मोबाईल टॉयलेट उभी केली जातात. परंतु, शहरातील सर्वांधिक गर्दी असलेल्या या परिसरामध्ये एकही मोबाईल टॉयलेट उभे असलेले दिसले नाही.यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करुनदेखील महिलांना आजही पालिकेकडून चांगल्या दर्जाच्या व सुरक्षित सुविधा उपलब्ध नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीमध्ये निदर्शनास आले.
जवळच्या लॉज, हॉटेलमध्ये जातो
गणेशोत्सवाच्या काळामध्ये सुरक्षितेसाठी दगडूशेठसह मानाच्या पाच ही गणपती, मंडई परिसरामध्ये महिला पोलीस कर्मचाºयांना ड्युटी लावली जाते. तब्बल बारा-बारा तास रस्त्यावर उभ्या असणाºया या महिला पोलिसांचीदेखील परिसरामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होते. दगडूशेठ परिसरामध्ये ड्युटीवर असलेल्या काही महिला पोलिस कर्मचाºयांनी सांगितले की, आम्ही ड्युटी लगतच्या परिसरामध्ये असलेल्या जवळचा एखादा लॉज, हॉटेलच्या स्वच्छतागृहाचा वापर करतो.
..........
तब्बल ३०० मोबाईल टॉयलेटचे टेंडर
महापालिकेच्या वतीने पालखी, गणेशोत्सवाच्या काळामध्ये स्वच्छतागृहांची मागणी वाढते. यामुळेच महापालिका निविदा प्रक्रिया राबवून खासगी संस्थांकडून मोबाईल टॉयलेट उपल्बध करुन देते. गणेशोत्सवासाठी तब्बल ३०० मोबाईल टॉयलेटची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, मागणी असेल त्यानुसार त्या परिसरामध्ये हे मोबाईल टॉयलेट लावण्यात येतात. यासाठी संबंधित ठेकेदाराला स्वच्छता व देखभालीसाठी दिवसाला तब्बल १,८०० रुपये दिले जातात. - ज्ञानेश्वर मोळक, घनकचरा विभागप्रमुख