मास्कवरून डॉक्टरांनाच शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:12 AM2021-04-04T04:12:20+5:302021-04-04T04:12:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कल्याणीनगर येथील एका उच्च सोसायटीत मास्क वापरण्याविषयी डॉक्टरांनी मुलाला सल्ला दिल्यानंतर त्याच्या वडिलांनी डॉक्टरांनाच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कल्याणीनगर येथील एका उच्च सोसायटीत मास्क वापरण्याविषयी डॉक्टरांनी मुलाला सल्ला दिल्यानंतर त्याच्या वडिलांनी डॉक्टरांनाच शिवीगाळ करण्याचा प्रकार समोर आला. शेवटी पोलीस चौकीत वडिलांनी माफी मागितल्यावर याविषयावर पडदा टाकण्यात आला. मात्र, तोपर्यंत मुलगा व त्याचे वडील ज्या पद्धतीने कोविडसाठी काम करणार्या डॉक्टरांशी संभाषण करत होते, त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यामुळे शहरात याची एकच चर्चा सुरु होती.
कल्याणीनगरमधील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला. येथे राहणाऱ्या व कोविडसाठी काम करणार्या एका डॉक्टरांनी मास्क न वापरणाऱ्या एका मुलाला मास्क वापरण्याचा सल्ला दिला. मी कोविड रुग्णांमध्ये काम करतो, मला झाला असेल तर तुलाही होईल, असे सांगितले. यावर तो मुलगा उर्मटपणे डॉक्टरांनाच उलटा बोलला. शिवाय मला कोरोना होऊन गेला आहे. त्यानंतर त्याने आपल्या वडिलांना काहीबाही सांगितले. त्याचे वडील या डॉक्टरांच्या घराबाहेर तावातावाने आले. त्यांनी आमच्या मुलाला शिकवायची गरज नाही. असे काहीबाही बोलून डॉक्टरांना शिवीगाळ केली. आम्हाला लिफ्ट वापरु नका, असे सांगणारे तुम्ही कोण असे म्हणत आदळआपट केली. त्यानंतर सोसायटीच्या चेअरमनसह सर्व जण रामवाडी चौकीत गेले. तेथे मुलाच्या वडिलांनी डॉक्टरांची लेखी माफी मागितली. डॉक्टरांनीही हा आमच्या सोसायटीतील प्रकार असल्याने आम्ही सामंजस्याने मिटवित असल्याचे सांगून त्यावर पडदा टाकला.