पशुधनांचाही आता उतरवता येणार विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 11:27 PM2018-12-16T23:27:55+5:302018-12-16T23:28:42+5:30
योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन : पशुपालकांचे होणारे नुकसान टळणार
पुणे : केंद्र शासनाकडून राज्यामध्ये पशुधन विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५० हजार पशुधन घटकाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पशुधनांचाही विमा उतरवण्यात येणार आहे. यासाठी पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विधाटे यांनी केले.
जिल्ह्यासह राज्यात दररोज विविध आजार किंवा अपघातात जनावरांचा मृत्यू होतो. त्यांचा विमा नसल्यामुळे पशुपालकांना नुकसान सहन करावे लागते. पशुपालकांचे होणारे हे नुकसान टाळण्यासाठी ‘पशुधन विमा योजना’ सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात सर्वसाधारण घटकासाठी ४० हजार तर विशेष घटकासाठी १० हजार पशुधन घटकाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये शेळी, मेंढी, गाई, म्हशी, शेळी, ससा, डुक्कर, घोडा, गाढव, उंट या प्राण्यांचा विमा काढण्यात येणार आहे. एक वर्षासाठी २.९५ तर तीन वर्षांसाठी ७.५० रुपये प्रिमियम पशुपालकांना भरावा लागणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडून यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. दरम्यान, केंद्र शासनाने निश्चित केलेल्या भौतिक उद्दिष्टानुसार प्राथमिक स्तरावर प्रत्येक जिल्ह्यात दीड हजार पशुधन घटक याप्रमाणे राज्यातील पशूंचा विमा उतरविण्यात यावा, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात ही योजना राबविण्यात येणार आहे.
पशुपालकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यासाठी आवश्यक ती माहिती भरून या योजनेचा लाभ घ्यावा. जेणेकरून पशू दगावल्यावर पशुपालकाचे होणारे नुकसान टाळले जाईल.
डॉ. एस. बी. विधाटे, पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद पुणे